Akurdi : सुरांबरोबरच शब्दरत्ने वेचणारी स्वरसायली – सायली राजहंस

एमपीसी न्यूज – ‘तू माझा सांगाती’ या मालिकेत रखुमाई म्हणजेच रुक्मिणीची भूमिका करताना वयाचे वेगवेगळे टप्पे अभिनयातून दर्शवता आले. त्याचबरोबर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील राजकुंवर भोसले – शिर्के ही व्यक्तिरेखा रंगवताना शांत, संयत पण ठाम शिवकन्या कशी असेल ते रसिकांसमोर मांडता आले’, असे आपल्या वेगवेगळ्या भूमिकांचे मर्म चिंचवडची सायली राजहंस उलगडून सांगत होती. काही दिवसांपूर्वी साहित्य, संगीत, कला क्षेत्रातील चार कवयित्रींवर आधारित स्वरसायली प्रस्तुत ‘वेचू शब्दरत्ने’ हा वेगळ्या धाटणीचा सांगितिक कार्यक्रम सायली हिने सादर केला. त्यानिमित्ताने तिची भेट घेतली असता आपली कलाकारकीर्द कशी सुरु झाली, सध्या कोणकोणते प्रकल्प सुरु आहेत याविषयी सायली भरभरुन बोलली.

मूळच्या इचलकरंजीच्या पूर्वाश्रमीच्या सायली कुलकर्णीला घरातूनच संगीताचे, कलेचे बाळकडू मिळाले. वडील संगीताचे उपासक, आजी सुंदर कविता करायची. त्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच सायलीने सांगलीचे ज्येष्ठ गायक व गुरु कै. चिंतुबुवा म्हसकर यांच्याकडे गायनाचे शिक्षण सुरु केले. त्या कालखंडात खूप मोठ्या गायकांचे गाणे मनमुराद ऐकता आले. झी मराठीने २००७ साली आयोजित केलेल्या सारेगमप या स्पर्धेत सायलीने सहभाग घेतला. त्यात ती अंतिम तीस स्पर्धकांमध्ये निवडली गेली होती. तिचे गाणे ऐकून परीक्षक देवकी पंडित आणि अवधूत गुप्ते यांनी तुझा वेगळ्या धाटणीचा आवाज आहे, तो जप आणि असेच गाणे सुरु ठेव हा गुरुमंत्र दिला होता. त्यामुळे सायलीचे गाणे सुरुच राहिले.

पुढे लग्नानंतर ती कराडला आली. तिथेदेखील तिचे गाणे सुरु होते. त्यावेळी कराडमध्ये सायलीने गुरुपौर्णिमा महोत्सव सुरु केला. स्वरानंद संगीत विद्यालयाच्या माध्यमातून संगीतशिक्षण देण्यास सुरुवात केली. पुढे पुण्यात आल्यानंतर सायलीच्या एका वेगळ्याच पैलूची तिला आणि रसिकांना देखील नव्याने ओळख झाली. त्याचं झालं असं, एका नाट्यवाचन स्पर्धेत सायलीने भाग घेतला. तिथे तिला उत्तम वाचिक अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळाले आणि मग सुरु झाली गाण्याबरोबर अभिनयाची नवी इनिंग. त्या पारितोषिकामुळे थेट ‘आई रिटायर होतेय’ हे व्यावसायिक नाटक मिळाले. त्यातील बेबी हे बंडखोर कॅरॅक्टर करायला मिळाले. अभिनय आणि संगीताची पार्श्वभूमी असल्याने ‘संगीत होनाजी बाळा’ हे संगीत रंगभूमीवर एकेकाळी गाजलेले नाटक मिळाले. त्यात तर गायन, अभिनय आणि नृत्यदेखील करायला मिळाले. हा सायलीच्या आय़ुष्यातील टर्निंग पॉईंट होता असे म्हणायला हरकत नाही.

पुढे ‘संगीत सौभद्र’मध्ये रुक्मिणी साकारता आली. त्यानंतर डॉ. गिरीश ओक अभिनित ‘तो मी नव्हेच’मध्ये सुनंदा दातार ही व्यक्तिरेखा रंगवता आली. त्यात सायलीला गाणे देखील गायचे असे. त्याची आठवण सांगताना सायली म्हणाली की, प्रयोगापूर्वी मला डॉ.ओक फर्माइश करायचे की सायली, आज अमुक अमुक गाणे म्हण, मी ते म्हणायचे. पुढच्या प्रयोगाला दुस-या कोणत्यातरी गाण्याची फर्माईश असायची. खूप मजा यायची.

याच नाटकातील भूमिकेमुळे ‘तू माझा सांगाती’ या मालिकेमधील रुक्मिणी साकारण्याची संधी मिळाली. आणि मग माझे मालिकेतून दूरदर्शनवर पदार्पण झाले. नाटक, मालिका सुरु झाल्या. रुक्मिणी साकारताना खूप सुंदर अनुभव आले. याची शिदोरी पाठिशी घेऊन मग ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत ‘शिवकन्या राजकुंवर’ साकारता आली. त्या मालिकेचे अनुभव अतिशय हृद्य आहेत. सेटवर प्रवेशद्वाराशीच देवीचे मंदिर उभारण्यात आले आहे. दिवसाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या आरतीने होते. दिग्दर्शक विवेक देशपांडे, कार्तिक केंढे, डॉ. अमोल कोल्हे व्यक्तिरेखा साकारताना ती समजून घेण्यासाठी खूप मदत करतात.

या व्यक्तिरेखांची इतिहासात खूप विस्ताराने माहिती नाही. त्यामुळे त्या समजून घेऊनच साकाराव्या लागतात. या मालिकेच्या सेटवर ऐतिहासिक पुस्तकांची मोठी लायब्ररी आहे. त्याचीदेखील मोलाची मदत होते. राजकुंवर एकीकडे शिवकन्या आहे आणि त्याचबरोबर शिर्क्यांची सून देखील आहे. तापट पण शूर नव-याची समंजस, ठाम बायको आहे. हे खूप चॅलेंजिंग आहे. ही व्यक्तिरेखा साकारताना भविष्यकालीन दृष्टी, आत्मविश्वास आपोआप येत गेला असे सायली आवर्जून सांगते.

याचबरोबर सोनी मराठी या नव्याने सुरु झालेल्या चॅनेलवरील ‘गर्जा महाराष्ट्र’ या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांवरील मालिकेत सायलीने माई आंबेडकरांची भूमिका देखील केली. त्याचाच अनुभव घेऊन मग सोनीच्याच ‘मेरे साई’ या मालिकेतदेखील चमकण्याची संधी मिळाली. याचबरोबर आणखी देखील एक वेगळा अनुभव नकताच सायलीने आपल्या गाठीशी बांधला आहे. नुकतेच तिने ‘६६, सदाशिव’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि प्रवीण तरडे यांच्या बरोबर एक उल्लेखनीय भूमिका केली आहे. म्हणजेच नाटक, मालिका आणि आता चित्रपट सगळ्या क्षेत्रात सायलीची जोमाने घोडदौड सुरु झाली आहे. मात्र या सगळ्यात तिच्यातली कवयित्री कुठेतरी आतून धडका देत हेती. सायली ‘स्वरसायली’ या नावाने सुंदर, अर्थपूर्ण कविता लिहिते. तिच्या कविता उत्कट व मनाला भिडणा-या असतात. प्रेम, विरह, ओढ, या सगळ्या भावना कवितेतून जिवंत करायला तिला आवडतात. आगामी काळात तिने रचलेल्या गीतांचा अल्बमदेखील रसिकांच्या भेटीला येणार आहे.

याच कवितांच्या ओढीने सायलीने नुकताच संत जनाबाई, बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत आणि शांता शेळके यांच्या काव्यरचनांवर आधारित ‘वेचू शब्दरत्ने’ हा सांगितिक कार्यक्रम सादर केला. यात या चार कवयित्रींच्या साथीने पद्मा गोळे, संजीवनी मराठे, प्रभा गणोरकर, अरुणा ढेरे, संजीवनी बोकील, वंदवा बोकील, कविता महाजन आणि सावित्रीबाई फुले यांच्या कविता सादर करण्यात आल्या. सावित्रीबाई फुले यांच्या रसिकांच्या नजरेआड असलेल्या कविता यानिमित्ताने सायलीने सादर केल्या. आगामी काळात ‘सखा पांडुरंग’ आणि ‘तुका आकाशाएवढा’ हे कार्यक्रम करण्याचे नियोजन आहे.

त्याशिवाय ज्येष्ठ गायिका आणि सायलीने प्रेरणास्थान असलेल्या विदुषी किशोरी आमोणकर यांच्या गायनावर आधारित ‘स्मरण’ ही सांगितिक श्रद्धांजली अर्पण करण्याचा तिचा मानस आहे. तसेच स्वरांगण रसिक योजनेच्या माध्यमातून स्वरसायली क्रिएशन प्रस्तुत आठ सांगितिक कार्यक्रमांची स्वर भेट रसिकांना देण्याचा विचार आहे. लोकांपर्यंत चांगले विचार या सर्व माध्यमांतून पोचवण्याचा माझी प्रामाणिक प्रयत्न आहे असे या निमित्ताने सायलीने आवर्जून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.