Chinchwad : दारू पिऊन पोलीस ठाण्यात दंगा करणा-या ‘त्या’ मुलींना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी

एमपीसी न्यूज – दारू पिऊन मध्यरात्री भर रस्त्यावर पोलिसांशी हुज्जत घालून पोलीस ठाण्यात दंगा करणा-या मुलींना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मोरवाडी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली असून हा प्रकार गुरुवारी (दि. 30) मध्यरात्री एक वाजता वाल्हेकरवाडी मधील आहेर गार्डनच्या बाहेर घडला. त्यावरून एक तरुण आणि दोन तरुणी असे तिघांना चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

स्मिता किशोर बाविस्कर (वय 22, रा. सेक्टर नंबर 22, ओटास्कीम, निगडी), प्रिया प्रदीप पाटील (वय 30, रा. अंजिनाथा हाऊसिंग सोसायटी, पाटील नगर, चिखली) आणि आकाश मिलिंद कोरे (वय 25, कोकणे कॉलनी, नढे नगर, काळेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस गुरुवारी (दि. 30) मध्यरात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन समोर स्मिता, प्रिया आणि आकाश हे तिघेजण संशयितरित्या थांबलेले आढळून आले. त्यांच्याजवळ नंबर नसलेली दुचाकी होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी तरुणींनी पोलिसांना अर्वाच्य भाषा वापरली आणि पोलिसांशी हुज्जत घातली. त्यावरून पोलिसांनी तिघांनाही चिंचवड पोलीस ठाण्यात आणले. तरुणींनी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचा-यांसोबत अर्वाच्य भाषा वापरून दंगा केला. त्यामुळे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. यावरून पोलिसांनी तिघांवरही गुन्हा नोंदवून अटक केली. तिघांनाही मोरवाडी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिघांची पंधरा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

दरम्यान, दंगा घालणा-या मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीमध्ये आरोपींनी दारू प्यायल्याचे निष्पन्न झाले. यावरून आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 85 या कलमाची वाढ करण्यात आली आहे. सुरुवातीला आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 353, 294, 504, 34 आणि मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 192 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वैद्यकीय तपासणीनंतर आणखी एका कलमाची वाढ करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.