Pune : सदाबहार गीतांचा ‘सुरीला सफर’ पाच सप्टेंबरला

स्मिता भद्रिगे, विजय वडवेराव यांचे सादरीकरण; आपुलकी फाउंडेशनतर्फे आयोजन

एमपीसी न्यूज – आपुलकी फाउंडेशन आणि स्वरा इव्हेंट्स आयोजित ‘सुरीला सफर’ कार्यक्रमातून पुणेकर रसिकांना जुन्या हिंदी-मराठी सदाबहार गीतांचा नजराणा अनुभवता येणार आहे. बुधवार (दि. 5) रोजी नवी पेठेतील निवारा सभागृहात ही मैफल रंगणार असून, प्रसिद्ध गायिका स्मिता भद्रिगे, विजय वडवेराव यांचे मुख्य गायन, तर सुभद्रा मंडल, रमेश कानडे यांचे गायन असणार आहे. गजलकार, संगीतकार विजय वडवेराव यांच्या निर्मिती-संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार होत आहे. प्रवेश विनामूल्य आहे.

विजय वडवेराव गजलकार व संगीतकार आहेत. ‘वेशिवरचा दगड’, ‘चंद्रही पेटेल’ हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून, दोन्ही काव्यसंग्रहांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत. कवी संमेलने व गजल मुशायऱ्यातून वडवेराव सादरीकरण करत असतात. स्वतः रचलेल्या व संगीतबद्ध केलेल्या गजलांचा ‘गीत गजल बरसात’ हा कार्यक्रम महाराष्ट्रभर होत आहे.

स्मिता भद्रिगे या अंबरनाथ येथील सुप्रसिद्ध गायिका आहेत. गेली 15-20 वर्षे महाराष्ट्रभर सुगम संगीताचे कार्यक्रम करीत आहेत. मराठी भावगीते, भक्ती गीते, गजल तसेच लता मंगेशकर आशा भोसले यांच्या सुमधूर जुन्या सदा बहार हिंदी मराठी गीतांचे गायन करत आहेत.

“हल्लीच्या धांगडधिंगा संगीताच्या काळात जुन्या मराठी हिंदी सदाबहार गीतांच्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी व जुनी दर्जेदार लोकप्रिय चित्रपट गीतांची मेजवानी रसिकांना देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अवीट चवीच्या गीतांच्या गायनाने हा कार्यक्रम रसिकांना सुरीला सफर घडवेल,” असे विजय वडवेराव यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.