Hinjawadi : बावधनमधील बंगल्यात दरोडा टाकण्याच्या तयारीततील एका सराईतासह पाच जणांना अटक

तलवार आणि कोयत्यासारखी घातक शस्त्रे जप्त; हिंजवडी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – बावधन येथील एका बंगल्यामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. अटक आरोपींपैकी एकजण सराईत आरोपी आहे. त्यांच्याकडून तलवार आणि कोयत्यासारखी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सोमवारी (दि. 21) रात्री साडेदहाच्या सुमारास बावधन येथे मुंबई-पुणे महामार्गावर रामनगर कॉलनीमध्ये केली.

समीर ऊर्फ पप्पु बबन गुजर (वय 28, रा. मुळशी), किरण कुमार पिल्ले (वय 21), अजितेश राजाराम चव्हाण (वय 19), विनायक ऊर्फ सुनील राऊत (वय 26) आणि रितेश सुभाष शिंदे (वय 20, चौघे रा. पिरंगुट) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन पोलीस चौकीतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या हद्दीमध्ये सोमवारी रात्री गस्त घालत होते. रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिसांना मुंबई-पुणे महामार्गावर रामनगर कॉलनीमध्ये काही तरुण संशयितरित्या थांबल्याचे दिसले. पोलिसांनी हिंजवडी तपास पथकातील पोलिसांना तात्काळ बोलावून घेतले. पोलिसांची चाहूल लागताच संशयित तरुण पळून जाण्याचा तयारीत असताना परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

तरुणांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तलवार, कोयता, लोखंडी फायटर, स्प्रे असा एकूण 1 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळाला. पोलिसांनी सर्व ऐवज जप्त करत त्यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी बावधन येथील एका बंगल्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. बंगल्यात दरोडा टाकण्याचा कट किरण पिल्ले आणि रितेश शिंदे या दोघांनी रचला होता. यातील पप्पु गुजर याच्यावर पौड पोलीस ठाण्यात मारहाणीचा तर कोल्हापूर येथील राजवाडा पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे उघडकीस आले आहे.

ही कारवाई हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजी गवारे, पोलीस उपनिरीक्षक अशोक गवारी, वरुडे, वलटे, पोलीस कर्मचारी किरण पवार, प्रमोद पवार, आतिक शेख, कुणाल शिंदे, श्रीकांत चव्हाण, सुभाष गुरव, झनकसिंग गुमलाडु, अमर राणे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.