Flood Compensation : महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून 701 कोटींची मदत

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राने 701 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे‌. महाराष्ट्रात जून – ऑक्टोबर 2020मध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका हा राज्यातील शेतीलाही बसला होता. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना याबाबत माहिती दिली‌.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून जून- ऑक्टोबर 2020 मध्ये आलेल्या पूरासाठी महाराष्ट्राला 701 कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. तसेच कर्नाटक राज्यासाठी 629 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी मराठवाडा विशेषत: उस्मानाबाद आणि परभणी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेती व बागायती पिकांच्या प्रश्नावर सरकारने लोकसभेत उत्तर दिले आहे. जून – ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, एनडीआरएफकडे आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने निवेदन सादर केले होते.

दरम्यान, 2020-21 मध्ये, खरीप व रब्बी हंगामात ‘पंतप्रधान फसल बीमा’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 67.96 लाख हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविण्यात आला आहे. ज्यायोगे 11.43 लाख शेतकऱ्यांठी 750.12 कोटी रुपये दिले गेल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.