Veerbhadra Singh passed away: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांचं गुरुवारी पहाटे निधन

एमपीसी न्यूज : हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांचं गुरुवारी पहाटे निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्यावर शिमल्यातील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते.

आज पहाटे वीरभद्र सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर वीरभद्र सिंह यांना घरी सोडण्यात आलं होतं. मात्र त्यांची तब्येत पुन्हा खालावली आणि त्यांना आयजीएमसीमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

नऊ वेळा आमदार आणि पाच वेळा खासदार असलेले वीरभद्र सिंह हे सहा वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते. वीरभद्र सिंह यांच्या पश्चात पत्नी प्रतिभा सिंह, मुलगा आणि शिमला ग्रामीणचे आमदार विक्रमादित्य सिंह आणि मुलगी अपराजिता सिंह असा परिवार आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते केंद्रीय मंत्री, पर्यटन व नागरी उड्डाण, उद्योग राज्यमंत्री, केंद्रीय पोलाद मंत्री आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.