Talegaon Dabhade : साळुंब्रे येथील पवना नदीवर पूल बांधण्यासाठी 14 कोटी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध

एमपीसी न्यूज – साळुंब्रे येथील पवना नदीवर नवीन कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा व त्यावर दुपदरी पूल बांधण्याच्या कामासाठी आमदार सुनिल शेळके यांनी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून सुमारे 14 कोटी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या कामाचे भुमिपूजन मंगळवारी (दि. 8) कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्ष सारिका सुनिल शेळके व स्थानिक महिलांच्या हस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी बोलताना सारिका शेळके म्हणाल्या, मावळ तालुक्यात असे एकही गाव नाही, कि ज्या गावात आमदार शेळके यांनी निधी उपलब्ध करून दिला नाही. प्रत्येक गावांतील विविध विकास कामांसाठी अण्णांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. मागील अनेक वर्षांपासून जी विकासकामे रखडली होती, ती अवघ्या दोन वर्षात मार्गी लावली आहेत व पुढील पाच वर्षांमध्ये जी कामे पूर्ण होणे अपेक्षित होती ती पूर्ण होत आहेत. आपल्या गावांतील विकास कामांसाठी आमदार शेळके यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. मात्र कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ग्रामस्थांची देखील आहे.

यावेळी सरपंच उज्वला नंदकुमार आगळे, उपसरपंच द्वारकाबाई राक्षे, ग्रामपंचायत सदस्य सुजाता अनपट, सीमा राक्षे, हर्षदा बोडके, साळुंब्रे राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा राणी राक्षे,साळुंब्रे विकास सोसायटीच्या अध्यक्षा सिंधू राक्षे, माजी उपसरपंच कल्याणी राक्षे, रेश्मा विधाटे, इंदुबाई राक्षे,शकुंतला राक्षे,मनिषा आगळे, पाटबंधारे विभागाचे विभागीय अभियंता अशोक शेटे आदि मान्यवर उपस्थित होते.

साळुंब्रे- गहुंजे दरम्यान असणाऱ्या पवना नदीवर पूर्वी पूल नसल्याने याठिकाणी सिमेंटचे पाईप व मुरूम टाकुन तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता बनविण्यात आला होता. मात्र नदीवरील हा रस्ता दरवर्षी पावसाळ्यात वाहुन जात असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. तसेच याठिकाणी पवना नदीवर बंधारा नसल्याने येथील शेतकऱ्यांच्या पाणी पंपांना मुबलक पाणी उपलब्ध होत नव्हते. यामुळे याठिकाणी नदीवर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा व दळणवळणासाठी पूल बनविणे गरजेचे असल्याने आमदार सुनिल शेळके यांनी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करून याठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा व त्यावर वाहतुकीसाठी दुपदरी पूल बनविण्याच्या कामासाठी सुमारे 14 कोटी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

या पुलाच्या कामास लवकरच सुरवात करण्यात येणार असून लवकरात लवकर बंधारा व पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. साळुंब्रे येथे होणाऱ्या या पूलामुळे साळुंब्रे ते गहुंजे दरम्यानचा रस्ता जोडला जाणार आहे. यामुळे साळुंब्रे, गहुंजे व परिसरातील गावांसाठी हा पूल फायदेशीर ठरणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.