Sangvi : सांगवीतील तीन दिवसीय अटल महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

51 हजार 276 रूग्णांनी घेतला शिबीराचा लाभ

एमपीसी न्यूज – राज्य शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सांगवी येथे आयोजित मोफत अटल महाआरोग्य शिबीरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज (दि.13) रोजी तिसऱ्या दिवसाअखेर तब्बल 51 हजार 276 रुग्णांची तपासणी करण्यात आली असल्याचे पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. डोळ्याच्या आजारांशी संबंधित 8 हजार 349, कान, नाक व घसा आजारांशी संबंधित 2 हजार 120, कॅन्सर आजाराशी संबंधित 891, हाडाच्या आजारांशी संबंधित 1 हजार 754, दातांच्या आजाराशी संबंधित 3 हजार 695 रुग्णांवर या शिबीरात उपचार करण्यात आले असल्याची माहिती माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी दिली.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून दि.11 ते 13 जानेवारी दरम्यान सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर गरजू व गोरगरीब रुग्णांसाठी मोफत ‘अटल महाआरोग्य’ शिबीराचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (दि.11) सुरू झालेल्या तीन दिवसीय या आरोग्य महाशिबिराचा गोरगरीब रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. या शिबीरात सर्व रोगांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आले.

या आरोग्य महाशिबिरात तिसऱ्या दिवसा अखेर 51 हजार 276 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात डोळ्याचे आजार झालेल्या तब्बल 8 हजार 349 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांच्यावर जागेवरच उपचार करून त्यापैकी ५ हजार ५०० रुग्णांना चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आले. कान, नाक व घसा याच्याशी संबंधित आजार असलेल्या 2 हजार 120 रुग्णांची तपासणी करून 230 रुग्णांना श्रवणयंत्र मोफत वाटण्यात आले. दाताचे आजार झालेल्या 3 हजार 300 रुग्णांची, हाडांच्या आजारांशी संबंधित 1 हजार 754 रुग्णांची, त्वचाविकार झालेल्या 2 हजार रुग्णांची, स्त्रीरोग व कॅन्सरसदृश्य आजार झालेल्या 3 हजार 583 रुग्णांची प्रामुख्याने तपासणी करण्यात आली. तसेच या शिबिरात 1 हजार 300 रुग्णांची ह्दय तपासणी करण्यात आली. त्यापैकी 9 रुग्णांवर अँजिओग्राफीची शस्त्रक्रिया करण्यात आली. याशिवाय 32 अपंगांना जयपूर फूट, 8 रुग्णांना व्हिलचेअर वाटप करण्यात आले आहेत.
या शिबिरासाठी सर्व रुग्णालयांच्या व्यवस्थापनांनी चांगले सहकार्य केले. याशिवाय भाजपचे सर्व पदाधिकारी व लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्यावतीने शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली गेली. या सर्वांच्या बळावर हे शिबिर यशस्वी झाले आहे. या आरोग्य महाशिबिराला गोरगरीब रुग्णांनीही तेवढाच चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
या शिबीरात पिंपरी चिंचवड शहर तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यातील रूग्णांनी सहभाग नोंदविला. आमदार लक्ष्मण जगताप यांनी या शिबीराच्या माध्यमातून गोरगरीबांना आजारांची मोफत तपासणी व उपचार करून दिल्याबद्दल रूग्णांनी मोठे समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.