Talegaon Dabhade : मावळाला सशक्त व समर्थ बनविण्यासाठी ‘व्हायब्रंट मावळ’ प्रकल्प – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – मावळ तालुका हा पुणे-मुंबईच्या मध्यस्थानी आहे. एक्सप्रेस-वे, लोहमार्ग, पुण्यातील विमानतळ अशा सुसज्ज व्यवस्था असणारे मावळ हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे स्थान आहे, या संसाधनांच्या वापर करून येत्या 5 वर्षांत मावळच्या सर्वांगीण विकासाला वेग देण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही ‘व्हायब्रंट मावळ’ हा प्रकल्प हाती घेत आहोत. या कार्यात आपण सर्व सहभागी होऊयात, आपला मावळ समर्थ व सशक्त घडवूयात, असे आवाहन मावळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व भाजप- शिवसेना- आरपीआय महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी केले.

बाळा भेगडे म्हणाले की, मावळच्या जनतेच्या कृपाशीर्वादाने दहा वर्षे मावळची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. २००९ व सन २०१४ मध्ये मला प्रचंड मताधिक्याने विजयी केले त्याबद्दल प्रथमत: मी मावळवासीयांचे मनापासून आभार मानतो. “सत्ता हे उपभोगाचे साधन नसून जनसेवेचे व्रत आहे” हे मनाशी बाळगून केंद्र व राज्य सरकराच्या निधीतून मावळचा सर्वागीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि मावळ तालुक्‍यातील सर्व भागांना विकासाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहे.

हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मावळभूमीमध्ये मोठया प्रमाणावर निसर्ग संपदा असल्याने मावळ तालुक्याची ओळख धार्मिक व पर्यटन स्थळ अशी झाली आहे. निसर्गाने नटलेला लोणावळा, खंडाळा परिसर नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतो आणि म्हणूनच तालुक्याचा पर्यटन विकास व्हावा व येणाऱ्या पर्यटकांना सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मी कटीबद्ध आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणारे गडकोट मावळ तालुक्‍यात आहे. त्यांचा विकास व्हावा या दृष्टीने मी प्रयत्न करीत आहे. त्याच धर्तीवर ‘लोहगड’ किल्ला ऐतिहासिक विकासाचे मॉडेल म्हणून विकसीत करीत आहे, असे त्यांनी सांगितले.

रस्ते विकासासाठी सर्वाधिक निधी

तालुक्‍यातील प्रमुख रस्ते म्हणजे तालुक्याच्या रक्तवाहिन्या असे नेहमीच म्हटले जाते. रस्त्यामुळे दळणवळण वाढून आर्थिक विकास होण्यास मदत होते. शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारपेठेत पोहचविण्यासाठी व नागरिकांना शहरात येण्यासाठी लागणारा वेळ वाचतो. म्हणून पवन मावळ, नाणे मावळ व आंदर मावळ भागातील रस्त्यांना शहरांशी, मुख्य रस्त्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे व तो पूर्णत्वास जात आहे. मावळमध्ये सर्वाधिक निधी हा रस्त्यांसाठी आणलेला असून त्यामुळे मावळचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरूवात झालेली आहे. याबरोबरच सामाजिक सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय, व्यायामशाळा इमारत व साहित्य, बंदिस्त सांडपाणी व्यवस्था, बसथांबे, स्मशानभूमी व निवाराशेड, साकव पूल, सौर दिवे, घंटागाडी, सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक, प्रयोगशाळा साहित्य आदी कामांसाठी जास्तीत जास्त निधी दिलेला असून ही सर्व कामे मार्गी लावलेली आहेत.

महाआरोग्य शिबिराचा एक लाखजणांना लाभ

रुग्णांची व दिव्यांगाची सेवा करण्याच्या दृष्टीने तळेगाव दाभाडे येथे पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक विभागातील तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. सदर शिबिराचा एक लाख नागरिकांनी लाभ घेतला. यासाठी लागणारी सर्व प्रकारची औषधे मोफत देण्यात आली होती व शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया सुरू आहेत. तसेच दिव्यांगाना व्हिलचेअर्स, जयपूर फूट व आवश्यक साहित्य मोफत देण्यात आलेले आहे, अशी माहिती भेगडे यांनी दिली.

वैयक्तिक लाभाच्या योजना घरोघर पोहचवल्या

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचला पाहिजे या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्‍तिक लाभाच्या योजना मावळ तालुक्यामध्ये प्रभावीपणे राबविलेल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य (आयुष्मान भारत) योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य), संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना तसेच जिल्हा परिषद/पंचायत समिती वैयक्‍तिक लाभाच्या योजना व शासनाच्या इतर सर्व योजनांचा लाभ मिळवून दिलेला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून जास्तीत जास्त गरजू रुग्णांना मदत केली आहे. प्रत्येक घरात कुठली ना कुठली योजना पोहचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे, असे त्यांनी सांगितले.

मावळ तालुक्यात नवलाख उंब्रे, उर्से, टाकवे आदी ठिकाणी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक नामांकित कंपन्यांनी आपले उद्योग, व्यवसाय सुरू केले आहेत. यात स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी मी आग्रही होतो आणि आहे, असे भेगडे म्हणाले. शिक्षण क्षेत्रात करीअर बाबत मार्गदर्शन व्हावे यासाठी महाराष्ट्रातील पहिल्या करीअर जत्रेचे आयोजन करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांना आपल्या करीअरच्या वाटा निवडताना याचा नक्कीच फायदा होईल असा मला विश्‍वास आहे. मावळ तालुक्‍याचा सर्वांगीण विकास व्हावा, हे ध्येय मनाशी बाळगून विकासाची ही गंगा घराघरात पोहचली पाहिजे, शहरी व ग्रामीण तसेच आदिवासी भागांचा सर्वांगीण विकास व्हावा हे माझे प्रामाणिक ध्येय आहे.

माझा मावळ विकसीत व स्मार्ट व्हावा यासाठी मी कटीबद्ध आहे. कार्यकर्त्यांची निष्ठा हीच माझ्या कामाची प्रेरणा आहे. मी आपल्या आशीर्वादाने व माझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून मावळात केलेल्या 1400 कोटीपेक्षा जास्त निधीच्या कामांचा अहवाल जनतेपुढे ठेवला आहे, असे त्यांनी सांगितले.

पक्षनिष्ठा व केलेल्या विकासकामांची पोचपावती

पक्षाने आतापर्यंत सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या आपण पूर्ण क्षमतेने पार पाडल्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने आपल्यावर विश्वास व्यक्त केला आहे. मावळच्या जनतेने सातत्याने भाजपला साथ दिली आहे. भाजपनेही मावळवासीयांच्या प्रत्येक सुख-दुःखात पाठराखण केली आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना महायुतीला मोठे बहुमत मिळेल, अशी परिस्थिती आहे. सत्तेच्या माध्यमातून मावळच्या विकासाला मिळालेली गती अधिक वाढविण्यासाठी जनता यावेळीही भाजपच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षांकडे स्वतःचा उमेदवार देखील नव्हता. भाजपकडून इच्छुक असणारा ‘उसना’ उमेदवार घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. विरोधी पक्षाचा आमदार तालुक्याचा विकास करू शकेल की सत्ताधारी पक्षाचा मंत्री तालुक्याचा कायापालट करील, हे समजण्यासाठी मतदार सूज्ञ आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही खोटे-नाटे आरोप केले तरी मावळची जनता त्याला फसणार नाही, असेही भेगडे म्हणाले. केलेल्या विकासकामांच्या जोरावर यावेळी आपण विक्रमी मताधिक्याने विजयी होऊ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे मावळला राज्यमंत्री नव्हे तर मंत्रिपद मिळेल, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.