Pune : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध- सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज – केंद्रात, राज्यात, पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या सत्तेचा फायदा मी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी करून घेणार आहे, असे प्रतिपादन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले आहे.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘एमपीसी न्यूज’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. विधानसभेची ही माझी पहिलीच निवडणूक आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला गेल्या पाच वर्षांत एक दिशा मिळालेली आहे. युवकांची मते लक्षात घेऊन या मतदारसंघाचा ‘निर्धारनामा’ प्रसिद्ध केल्याचेही शिरोळे या मुलाखतीत म्हणाले.

प्रश्न : ‘पीएमपीएमएल’ संचालक म्हणून आपल्याला या मतदारसंघात कोणती समस्या जाणवली?
उत्तर : ‘पीएमपीएमएल’ चा संचालक म्हणून काम करताना सध्याच्या सर्व मार्गाची आणि बसच्या वेळापत्रकाची फेरआखणी करण्याची गरज माझ्या लक्षात आलेली आहे. हे काम तातडीने सुरू करून सार्वजनिक वाहतूक व्यवसाय बळकट करणार आहे.

प्रश्न : हवेच्या प्रदूषणात मोठी वाढ होत आहे, काय सांगाल ?
उत्तर : वाढत्या वाहनांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ होत आहे. या दृष्टीने यापुढे शहरातील बस खरेदी फक्त इलेक्ट्रिक असेल. असा धोरणात्मक निर्णय झाला आहे. आरामदायी आणि प्रदूषणविरहित, किफायतशीर दरातील इलेक्ट्रिक बससेवा निश्चितपणे उपलब्ध करून देणार आहे.

प्रश्न : शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो मार्ग कधीपर्यंत पूर्ण होणार?
उत्तर : शिवाजीनगर ते हिंजवडी आशा स्वतंत्र 23 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचा आराखडा तयार झालेला आहे. तो 2021 पर्यंत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर मतदारसंघातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून प्रदूषणात घट होणार आहे. हजारो ‘आयटी’ युवकांचा प्रवास गतिमान होऊन त्यांना स्वास्थ्य लाभेल. त्यांना कुटुंबांचे आणि कामाचे संतुलन साधण्यासाठी मोठी मदत या मेट्रो मार्गामुळे होणार आहे.

प्रश्न : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विकासासाठी कसा पाठपुरावा करणार?
उत्तर : राज्य शासनाचा निधी कॅन्टोन्मेंट बोरडांनाही मिळण्यास प्रारंभ झाला आहे. खडकी कॅन्टोन्मेंट परिसरातील सुविधा अधिक बळकट करण्यासाठी त्यांच्यासमवेत योग्य समन्वय साधण्याची भूमिका ठेवणार आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांमध्येही मुख्य प्रवाहात असल्याची भावना निर्माण होईल.

प्रश्न : ओढ्यांच्या सुरक्षिततेची काळजी कशी घेणार?
उत्तर : पुण्यात नुकत्याच झालेल्या पावसात ओढे – नाल्यांच्या पुराचे भयावह स्वरूप दिसले. ही परिस्थिती बदलण्यासाठी ओढे – नाल्यांच्या पुररेषेतील अतिक्रमण रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. ओढ्यांच्या बांधबंदिस्ती अधिक मजबूत करण्यावर भर देणार आहे. या ओढ्यांचा नैसर्गिक प्रवाह कायम राहण्यासाठी खबरदारी घेणार आहे. ओढ्यांमध्ये कचरा साचणार नाही. तेथे राडारोडा टाकला जाणार नाही, यासाठी विशेष काळजी घेणार. तसेच, ओढ्यानजीकच्या वस्त्या आणि सोसायट्यांच्या सजग नागरिकांच्या गटांचे संघटन करून ओढ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणार आहे.

प्रश्न : महिला सुरक्षा संधार्भात काय उपाययोजना करणार?
उत्तर : महिलांसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ ही ओळख शिवाजीनगर मतदारसंघाला देण्याचा माझा निर्धार आहे. या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. उद्याने, मैदाने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था उत्तम असावी, यासाठी पाठपुरावा करणार आहे.

प्रश्न : पदपथावरचे अतिक्रमण कसे रोखणार?
उत्तर : पदपथावर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. हॉकर्स पॉलिसीनुसार निश्चित केलेल्या जागीच फेरीवाले असतील. त्यांचा सामान्य नागरिकांना वावरताना कोणताही अडथळा होणार नाही. याची दक्षता घेणार असून फेरीवाल्यांच्या योग्य पुनर्वसनासाठीही प्रयत्नशील राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.