Hinjwadi : उद्योगात येवू इच्छिणाऱ्यांनी जाणून घेतले उद्योगातील बारकावे

हिंजवडीत तिसरी 'येस समिट' नवउद्योजक परिषद संपन्न

एमपीसी न्यूज – आज नोकरीच्या संधी कमी होत चाललेल्या आहेत. त्यामुळे आजची तरुणाई उद्योगाकडे वळत आहे. या पार्श्‍वभूमीवर आजच्या तरुणाईची गरज ओळखून त्यांना उद्योगासंबंधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हिंजवडी येथे तिसर्‍या ‘येस समिट’ नवउद्योजक परिषदेचे आयोजन सीवायडीए संस्थेच्यावतीने करण्यात आले होते. या परिषदेसाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातून तरुण-तरुणी आले होते. उद्योग व्यवसायासंबंधी तब्बल दोनशेच्या आसपास आयडिया तरुणांना मिळाल्या.

या परिषदेत विविध नामवंत उद्योजकांनी या नवउद्योजकांना उद्योगातील बारकावे स्पष्ट करून सांगितले. यामध्ये आयटी क्षेत्रापासून ते सेंद्रिय शेतीपर्यंत अनेक उद्योगांचा समावेश होता. उद्योग व्यवसाय टाकताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याचे धडेही या परिषदेत मिळाले.

समारोप सत्रात आयबीएमचे संचालक आदेश गोखले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, ”आज सरकारी नोकर्‍या मिळणे शक्य नाही. त्यामुळे तरुणांनी प्रत्येक गोष्टीतून बोध घेऊन उद्योग सुरु करण्यासंदर्भात विचार केला पाहिजे. आज माहितीतंत्रज्ञानामुळे जग अगदी आवाक्यात आले आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून आपला व्यवसाय वाढविला पाहिजे. उद्योगात ‘रिकव्हरी’ला अधिक महत्त्व असल्याचे”ही त्यांनी सांगितले.

याच सत्रात देवराज बाविस्कर, अजय मेहता, कुश मुनोत, प्रिया कोठारी, सुजाता मेंगाने आदींनी उद्योगातील बारकावे, उद्योग सुरु करतानाची तयारी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उद्योगात येऊ इच्छिणार्‍या तरुण-तरुणींनी उद्योगासंबंधी आपले कल्पक विचार व्यक्त केले. यामध्ये सुमारे दोनशे कल्पना या तरुणांनी मांडल्या. यातील अनेकांना या कल्पनांबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

शेतीपूरक उद्योगांसंबंधी दीपक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. पर्यटन क्षेत्रातील उद्योगाबाबत चेतन गुजर, प्रशांत श्रीवास्तव, प्राजक्ता जोशी, संदीप काळे या उद्योजकांनी संबोधित केले. सामाजिक क्षेत्रातील उद्योगातील कल्पना व युक्ती संदर्भात रमा व्यंकटेचलम्, मंकज सिंग, बालाजी वरकत यांनी मार्गदर्शन केले. याबरोबरच लघुउद्योगासंबंधी बी.आर. व्यंकटेश, प्रियदर्शनी व्यंकटेश यांनी मार्गदर्शन करीत लघुद्योगात येण्याचे आवाहन त्यांनी केले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग व्यवसायातील संधीबाबत सुजाता मेंगाने आणि शेखर सरोदे यांनी मार्गदर्शन केले.

या परिषदेचे सूत्रसंचालन प्रिया कोठारी, प्रवीण जाधव, मॅथ्यू मत्तम यांनी केले. तर, सुजाता मेंगाने यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.