Pimpri News : मालमत्ता कर वसुलीचा उच्चांक; महापालिका तिजोरीत 625 कोटींचा महसूल

एमपीसी न्यूज – वाढते शहर आणि महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने केलेल्या प्रयत्नांमुळे पहिल्यांदाच मालमत्ता कर वसुलीचा उच्चांक गाठला आहे. 2021-2022 या सरत्या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून महापालिका तिजोरीत तब्बल 625 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. आज शेवटच्या दिवशी 50 कोटींचा कर वसुल झाला आहे. थेरगाव विभागीय कार्यालयातून सर्वाधिक 136 कोटी तर सर्वात कमी पिंपरी वाघेरे कार्यालयातून 6 कोटींचा कर जमा झाला. दरम्यान, मागीलवर्षीच्या तुलनेत 68 कोटी रुपये कर अधिक जमा झाला.

पिंपरी-चिंचवड शहरातील 5 लाख 69 हजार 514 मालमत्तांची महापालिकेकडे नोंद आहे. महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागामार्फत शहरातील इमारती व जमिनींवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येते. 16 विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून कर वसुलीचे काम केले जाते. 2021-2022 या आर्थिक वर्षात कर आकारणी विभागाला 850 कोटी रुपयांचे उदिष्ट होते.

कर आकारणी विभागाने कर वसुलीची कारवाई प्रभावीपणे केली. थकबाकीदारांना नोटीसा दिल्या. नोटीस देऊनही कराचा भरणा न केलेल्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. कर भरण्यास टाळाटाळ करणा-या 276 थकबाकीदारांच्या मालमत्ता सील केल्या. कोणताही दबाव जुगारुन कर आकारणी विभागाने काम केल्याने महापालिका इतिहासात पहिल्यांदाच उत्पनांचा उच्चांक गाठला आहे. आजअखेरपर्यंत 3 लाख 24 हजार 572 मालमत्ताधारकांनी 625 कोटी रुपये कराचा भरणा केला आहे.

सर्वाधिक कराचा भरणा ऑनलाइन झाला आहे. 2 लाख 322 मालमत्ताधारकांनी घरबसल्या ऑनलाइन बिलांचा भरणा केला आहे. या माध्यमातून तब्बल 284 कोटी 89 लाख रुपयांचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत झाला आहे. धनादेशाद्वारे 25 हजार 6 मालमत्ताधारकांनी 133 कोटी 9 लाख रुपयांचा भरणा केला. तर, डिमांड ड्राफ्टद्वारे 887 मालमत्ताधारकांनी 50 कोटी 95 लाखांचा भरणा केला.

रोखीने बिल भरणाऱ्या करदात्यांची संख्या 80 हजार 548 आहे. त्यादारे 85 कोटी 53 लाख रूपये भरले गेले आहेत. निफ्टद्वारे 291 मालमत्ताधारकांनी 19 कोटी 5 लाखांचा भरणा केला. आरटीजीएसद्वारे 166 मालमत्ताधारकांनी 30 कोटी 84 लाख रुपयांचा भरणा केला आहे. पॉस (pos) मशिनद्वारे 1 हजार 849 मालमत्ताधारकांनी 2 कोटी 34 लाखांचा भरणा केला. अवैध बांधकाम शास्ती समयोजनेतून 12 कोटी 57 लाखांचा भरणा झाला आहे.

कर आकारणी व करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख म्हणाले, ”कर आकारणी करणा-या कर्मचा-यांना प्रोत्साहन दिले. दंडात्मक, मालमत्ता सील करण्याच्या कारवाईसाठी पाठबळ दिले. कर प्रणालीतील तफावती कमी केल्या. न्यायपूर्ण, समर्थनीय कर प्रणाली केली. आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले.

थकबाकादीरांवर धडक कारवाई केली. कोणाचा दबाव घेतला नाही. कर्मचा-यांना प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले. त्यामुळे 625 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसुल झाला आहे. मार्च अखेरमुळे नव्हे तर यापुढे सातत्यापूर्ण कर वसुल करण्याची कारवाई केली जाईल. एप्रिल महिन्यात मालमत्ताधारकांपर्यंत बिले पोहचिवणार आहे. स्पीड पोस्टद्वारे बिले दिले जातील. मेल, बिलाची लिंक असलेले एसएमएस देखील मालमत्ताधारकांना पाठविले जाणार आहेत. शहरातील अनेक मोठ्या गृहनिर्माण संस्थांमधील काही सदनिकांची नोंद नाही. त्याचा शोध घेऊन त्यांनाही कर कक्षेत आणण्यात येणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.