Hinjawadi Crime News : अल्पवयीन मुलीला नशेचे इंजेक्शन देऊन रॅपर बॉयने केला बलात्कार

एमपीसी न्यूज – एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला रॅपर बॉयने प्रपोज केले. मुलीने प्रेमसंबंधासाठी नकार दिला असता रॅपर बॉय तरुणाने मुलीला त्याच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीला आरोपीने नशाकारक इंजेक्शन दिले. तसेच मारहाण करून तिच्या वडिलांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. ही घटना 25 सप्टेंबर 2020 ते 17 जुलै 2021 या कालावधीत मुळशी तालुक्यातील एका गावात घडली.

समीर विजय भालेराव उर्फ डॉनी सिंग (वय 28) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीने मंगळवारी (दि. 24) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर हा रॅपर बॉय आहे. त्याने काही मुलींना मॉडेलिंगचे काम लावले आहे. पीडित मुलीला देखील मॉडेलिंगची आवड असल्याने ती आरोपीच्या संपर्कात आली. काही दिवसानंतर समीरने फिर्यादी मुलीला एकतर्फी प्रेमातून प्रपोज केले. मात्र फिर्यादी यांनी त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला.

याचा राग आल्याने समीरने मुलीच्या घरी येऊन तिच्या लहान भावाला धमकावले आणि भावासोबत फिर्यादीला त्याच्या घरी नेले. तिथे त्याने फिर्यादीवर 25 सप्टेंबर 2020 ते 17 जुलै 2021 या कालावधीत बलात्कार केला. फिर्यादी झोपेत असतानाच समीर तिला नशाकारक इंजेक्शन देत असे. तसेच तिला घरात डांबून ठेवत असत. फिर्यादीने एकदा घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र समीरने तिला मारहाण करत पुन्हा घरी आणले.

दुसऱ्या वेळी फिर्यादी मुलगी आरोपीच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि तिने नातेवाईकांच्या कानावर तिच्यासोबत घडलेला प्रकार घातला. दरम्यान समीरने फिर्यादीचे काढलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकून धमकावले. असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 376 (2) (न), 354 (अ), 328 बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम कलम 4, 5 (एल), 6, 8, 12, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 (अ), 66 (इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.