Pimpri News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचे राजीनामा घ्या; मग, पालिका बरखास्त करण्यासाठी शासन मागेपुढे बघणार नाही – विलास लांडे

महापालिका बरखास्त केल्याशिवाय भाजपला जाग येणार नाही

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने भ्रष्टाचाराचा कळस केला आहे. महापालिकेला लुटुन, चाटून पुसुन खात आहेत. दोघांनी शहर वाटून घेतले. एसीबीने पालिकेत धाड टाकून अटकेची कारवाई केली. पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी करत त्यानंतर राज्य शासन महापालिका बरखास्त करण्यासाठी मागेपुढे बघणार नाही. महापालिका बरखास्त केल्याशिवाय भाजपला जाग येणार नाही, असे माजी आमदार विलास लांडे म्हणाले.

स्थायी समितीतील लाचखोरी प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजप भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत पिंपरी चौकात जागरण गोंधळ करत महापालिकेवर मोर्चा काढला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जागरण गोंधळ आंदोलन केले. “स्थायी समिती बरखास्त करा”, “नही चलेगी, नही चलेगी, टक्केवारी नही चलेगी” अशा जोरदार घोषणा दिल्या. पोतदार, नंदीबैल, वासुदेव, गोंधळी सहभागी झाले होते. त्यानंतर महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला आहे.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, विक्रांत लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक अजित गव्हाणे, नगरसेविका उषा काळे, स्वाती काटे, निकीता कदम, माजी उपमहापौर महंमद पानसरे, शमीम पठाण, गोरक्ष लोखंडे, विशाल वाकडकर, प्रवक्ते फझल शेख, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एसीबीच्या कारवाईनंतर आज (बुधवारी) महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज आंदोलने करण्यात येत आहे.

माजी आमदार विलास लांडे म्हणाले, भाजपवाले महापालिकेला लुटुन, चाटून पुसुन खातात. दोघांनी शहर वाटून घेतले. त्यामुळे नागरिकांना शहर सोडून जावे की काय अशी भीती वाटत आहे. पण, त्यांनी काळजी करु नये. शहराचे नेतृत्व अजितदादा पवार करत आहेत. आपण नंदी बैल आणला. गोंधळ घातला. पण, आपल्याला महापालिकेचा दरवाजा उघडता आला नाही ही निषेधाची बाब आहे. टक्केवारीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे. पवारसाहेब, अजितदादा, जयंत पाटलांना भेटून पक्षाच्या सगळ्या नगरसेवकांचे राजीनामे देऊन टाकावेत. महापालिकेत त्यांना काय खायचे ते खाऊ द्या. खरे तर महापालिका बरखास्त करुन प्रशासक नेमण्याची गरज आहे. महापालिका बरखास्त करा, त्याशिवाय भाजपला जाग येणार नाही.

आत्ता नगरसेवकांचे राजीनामे घ्या. काय फरक पडत नाही. सहा महिन्यांवर निवडणुका आहेत. अजितदादांना राजीनामे द्यावेत. त्यामुळे महापालिका बरखास्त करण्यासाठी शासन मागेपुढे बघणार नाही. घाबरु नका, पुन्हा तुम्हीच नगरसेवक होणार आहेत. भ्रष्टाचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व नगरसेवकांचे राजीनामे घ्यावेत. भ्रष्टाचार जनतेपर्यंत पोहचलाच आहे, असेही लांडे म्हणाले.

संजोग वाघेरे म्हणाले, ”स्थायी समितीतील राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचे राजीनामे देण्याचे अगोदरच जाहीर केले. चुकीच्या कामाला भीक घालणार नाही. भाजपने स्थायी समिती बरखास्त करावी. सर्व सदस्यांचे राजीनामे घ्यावेत”.

माजी महापौर योगेश बहल म्हणाले, ” भाजप पदाधिकारी भागीदारीत कामे घेतात. लाच प्रकरणात राजीनामे घेतले पाहिजे. भ्रष्टाचार हाणून पाडला पाहिजे. माफी मागायचे सोडून पुन्हा सत्ता येईल असे भाजपचे आमदार सांगत भ्रष्टाचाराचे समर्थन करत आहेत. ही शहरवासीयांसाठी शरमेची बाब आहे”.

प्रशांत शितोळे म्हणाले, महापालिकेत खुलेआम जनतेकडून पैसे घेतले जातात. भाजपच्या माध्यमातून महापालिकेला लागलेला काळा डाग पुसला पाहिजे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.