Hinjawadi : गृहनिर्माण संस्थांमध्ये 100 टक्के मतदार नोंदणीसाठी सदस्यांनी पुढे यावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

‘गृहनिर्माण संस्था मतदार नोंदणी अभियाना’चा शुभारंभ

एमपीसी न्यूज – निवडणूक प्रक्रियेविषयी असणारी उदासीनता दूर करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यांनी सहकार्य करावे आणि पुणे जिल्हा मतदान (Hinjawadi) प्रक्रिया व हक्कांबद्दल जागरूक आहे हे दाखवून द्यावे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कर्तव्यभावनेने सुटीच्या दिवशी आपल्याकडे मतदार नोंदणीसाठी येत असताना त्यांना प्रतिसाद देऊन 100 टक्के मतदार नोंदणी करून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

हिंजवडी येथील ब्लू रिज गृहनिर्माण संस्था येथे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मतदारांची 100 टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे आयोजित ‘गृहनिर्माण सोसायटी मतदार नोंदणी अभियाना’च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार रणजित भोसले, ब्लू रिज गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन राजेंद्र कुमार, सचिव पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते.

Loni Kalbhor : पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे म्हणाले, देश जेव्हा प्रतिकूल परिस्थितीतून किंवा वेगळ्या स्थित्यंतरातून जात असताना मतदारांची भूमिका महत्त्वाची असते. लोकशाही प्रक्रियेत सर्वसमावेशकता आणि मतदारांचा सहभाग असल्यास लोकशाही यशस्वी ठरते. त्यासाठी मतदार याद्यांचे शुद्धीकरण आवश्यक आहे. देशाचे भवितव्य तरुणांच्या हातात असताना केवळ 13 टक्के युवा मतदारांची नोंदणी झाली आहे. हे चित्र बदलण्याची गरज आहे.

मतदारांनी निवडणूक आयोगाचे ॲप आणि संकेतस्थळाचा वापर करून मतदार यादीतील नाव तपासून घ्यावे. 21 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घेत नागरिकांनी या प्रक्रियेत सहभाग घ्यावा. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हा निवडणूक प्रक्रियेचा कणा आहे त्यांच्या प्रयत्नांना गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांनी साथ द्यावी आणि राज्य व देशाला मार्गदर्शक काम पुणे जिल्ह्याने करून दाखवावे, असेही आवाहन त्यांनी केले.

भारतातील पहिली निवडणूक 1952 मध्ये घेण्यात आली. त्यावेळी देशात ही लोकशाही पद्धत टिकणार नाही असे भाकीत करण्यात आले. मात्र हे खोटे ठरवत भारतीय नागरिकांनी एकत्रितपणे निवडणूक प्रक्रिया यशस्वी करून दाखवली. देशातील लोकशाही प्रक्रियेच्या यशस्वी प्रवासावर आधारित 5 भागांची निवडणूक प्रक्रियेचे यश सांगणारी मालिका लवकरच दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे, असेही देशपांडे म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, भारतीय लोकशाही बळकट करण्यात भारत निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे. आयोगाने निवडणूक प्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक सुधारणा केल्या आहेत. निवडणूक पारदर्शकपणे घेण्यासोबत आता सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यावर तसेच निवडणुका मतदारांच्यादृष्टीने सुविधाजनक होतील यावर भर देण्यात येत आहे. मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्याच्या मतदार यादीत मोठ्या संख्येने युवा मतदारांना अद्याप नोंदणी करण्याची संधी आहे. निवडणूक प्रक्रियेत सुशिक्षित नागरिकांची भूमिका मार्गदर्शक असावी आणि त्यांनी मतदान प्रक्रियेत पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यादृष्टीने मतदार नोंदणीकरिता नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

संस्थेचे सचिव पाटील यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. प्रशासनाने मतदार नोंदणीसाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र कचरे यांनी केले. मतदार नोंदणीसाठी ब्लु रिज सोसायटीने चांगले सहकार्य केल्याचे सांगून त्यांनी नागरिकांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले.

मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात छायाचित्र मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आणि मतदार नोंदणी अर्ज स्वीकारून अभियानाचा शुभारंभ करण्यात (Hinjawadi) आला. जिल्हाभरातील 1 हजार 168 गृहनिर्माण संस्थांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.