Hinjawadi News : नववर्षाच्या पहाटे आयटीनगरीतील माण गावात रानगव्याचे दर्शन

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून पुणेकर आणि महाराष्ट्रात चर्चेचा विषय झालेल्या रानगव्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटेच्या वेळी माण गावात दर्शन दिले. मुळा नदीच्या बाजूने आलेला गवा काही वेळेनंतर पुन्हा नदीच्या दिशेला निघून गेला.

माण गावातील राक्षे वस्ती येथे रानगवा आल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले. त्यामुळे रानगवा पुणेकरांच्या पुन्हा चर्चेत आला. माण गाव परिसरात मुळशी तालुक्यात रानगवे आढळतात. त्या भागात त्यांचे वास्तव्य आहे. जंगल परिसरातून ते चुकून मानवी वस्तीमध्ये येतात. त्यामुळे नागरिकांची धांदल उडते.

_MPC_DIR_MPU_II

9 डिसेंबर रोजी पुणे शहरातील कोथरूड भागात गवा आढळला. अचानक मानवी वस्तीत आलेल्या गव्याची पुरती तारांबळ उडाली. त्यात नागरिक, वनविभाग पाठलाग करत असल्याने तो काँक्रीटच्या जंगलात सैरावैरा पळून थकला, जखमी झाला. दरम्यान त्यात त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर 22 डिसेंबर रोजी बावधन येथील पाषाण तलावाजवळ पुन्हा एकदा रानगवा दिसला. बराच वेळ बावधन परिसरात रस्त्याच्या कडेला फिरणा-या रानगव्याला वनविभागाने सुखरूप जंगलाचा रस्ता दाखवला. यानंतर आज (शुक्रवारी, दि. 1) पहाटे माण गावात गवा आढळला. मात्र, तो काही वेळेनंतर पुन्हा नदी परिसरातून जंगलात गेला असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.

दरम्यान, तो नदीकाठच्या एका उसाच्या शेतात असल्याची शंका देखील काहीजण व्यक्त करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.