Pimpri News: बोगस एफडीआर प्रकरण पोहचले गृहमंत्र्यांकडे, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा – कैलास बारणे

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कंत्राट मिळविताना बनावट फिक्स्ड डिपॉझिट रिसीट (एफडीआर) आणि बँक हमी देऊन महापालिकेची फसवणूक करणा-या 18 ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करण्यात स्थापत्य विभागाकडून चालढकल केली जात आहे. तक्रार कोणी द्यायची यावरुन शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांनी चिडीचूप भूमिका घेतली आहे. यामुळे ठेकेदारांना पाठबळ मिळत आहे. त्यामुळे बोगस एफडीआर व बँक हमी देणा-या ठेकेदारांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

कैलास बारणे यांनी आज पुण्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. महापालिकेची फसवणूक करणा-या 18 ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी बारणे यांनी गृहमंत्रांकडे केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन गृहमंत्री देशमुख यांना देण्यात आले आहे. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, अभय मांढरे उपस्थित होते.

त्यात गटनेते बारणे यांनी म्हटले आहे की, महापालिकेची विकास कामे घेताना ठेकेदारांनी बोगस एफडीआर, बँक हमी दिल्याचे आढळून आले आहे. त्या 18 ठेकेदरांना तीन वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यांची नावे महापालिकेने जाहीर केली आहेत. त्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश स्थायी समिती सभेत देण्यात आले आहेत.

मात्र, ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी चालढकल केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार कोणी द्यायची यावरुन शहर अभियंता, सर्व प्रभागाचे कार्यकारी अभियंता, बीआरटीएस, ईडब्ल्यूएस प्रकल्प अधिका-यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. सर्वांनी चिडीचूप भूमिका घेतली आहे. प्रत्येक जण एकमेकांकडे बोट दाखवून तक्रार देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे ठेकेदारांना पाठबळ मिळत आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही दुर्लक्ष केले आहे. याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी विनंती नगरसेवक बारणे यांनी गृहमंत्र्यांना केली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.