Hinjawadi : गोळीबार करून पळणाऱ्या आरोपीला पाठलाग करून पकडल्याबद्दल पोलीस आयुक्तांकडून पाच हजाराचे बक्षीस

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात गोळीबार करून पळून जाणाऱ्या आरोपीला पाठलाग करून पकडणाऱ्या हिंजवडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना पाच हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी हे बक्षीस जाहीर केले आहे. उपायुक्त नम्रता पाटील यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांचा शनिवारी (दि. 18) सत्कार केला. यावेळी सहाय्यक आयुक्त सतीश पाटील, श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे आदी उपस्थित होते.

हिंजवडी पोलिस ठाण्यातील अतुल इंगळे व शिवाजी अहिवळे या दोघां कर्मचाऱ्यांना हे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठ चौकात समीर येनपुरे याच्यावर शनिवारी (18 ऑगस्ट) सकाळी गोळीबार झाला होता. यात तो जखमी झाला. या घटनेनंतर पोलिसांची एकच धावपळ उडाली. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात 8-8 कर्मचाऱ्यांची एक टीम तयार केली आहे. गोळीबारानंतर आरोपी सांगवी किंवा हिंजवडीच्या दिशेने पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षावरून कळविण्यात आली होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील सांगवी, वाकड व हिंजवडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या टीमला सतर्क करण्यात आले होते. नाकाबंदी करून प्रत्येक वाहन तपासले जात होते.

दरम्यान, आरोपी शुक्राचार्य मडाळे हा पाषाणच्या दिशेने पळाला होता. त्याच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागून तो पुढे जात होता. यावेळी नाकाबंदी दरम्यान, पोलीस कर्मचारी इंगळे व अहिवळे यांनी शुक्रचार्य याच्या कंबरेला पिस्तूल पाहिले. त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर पुणे आयुक्तालयातील बरेच वरिष्ठ अधिकारी बावधन चौकीत दाखल झाले होते. हिंजवडी पोलिसांनी संपूर्ण प्रक्रिया करून त्याला पुणे पोलिसांच्या हवाली केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.