Hinjawadi : पोलीस असल्याची बतावणी करून पळवली होंडा सिटी कार

एमपीसी न्यूज – फोनवर बोलत थांबलेल्या कार चालकाला पोलीस असल्याची बतावणी करून त्याला धमकावून दारू पाजली. त्यानंतर होंडा सिटी कार, अॅपल कंपनीचा मोबाईल आणि सोन्याचे कडे असा एकूण 5 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 10) रात्री सव्वानऊच्या सुमारास बावधन येथे घडली.

याप्रकरणी यश अजय चौधरी (वय 18, रा. औंधगाव, पुणे) या तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चार इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद यश होंडा सिटी कार (बी आर 07 / आर 0280) मधून बावधन येथून जात होता. त्याला फोन आल्याने त्याने कार बाजूला घेतली आणि फोनवर बोलू लागला. त्यावेळी चार अनोळखी इसम त्याच्याजवळ आले. त्यांनी पोलीस असल्याची बतावणी केली. गाडीची डिक्की चेक करायची आहे असे सांगून यशला कारमधून खाली उतरवले. त्यानंतर यशकडून कारची चावी घेऊन त्याला दारू पाजली.

यशला जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याच्याकडील अॅप्पल कंपनीचा मोबाईल फोन, सोन्याचे कडे आणि कार असा एकूण 5 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन आरोपींनी पोबारा केला. हा प्रकार देहूरोड कात्रज बायपासवर एचईएमआरएल कंपनी समोर बावधन ते युनायटेड क्रेन कंपनी पौड या दरम्यान घडला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.