Hinjawadi : विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू; एकजण जखमी

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रिक पोलवर दिवे बसवण्याचे काम करत असताना एका चालू असलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू झाला. तर एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज, सोमवारी (दि. 30) दुपारी साडेपाचच्या सुमारास भोईरवाडी, फेज तीन येथे घडली.

सागर आयाप्पा माशाळकर (वय 20), सागर कुपू पारंडेकर (वय 19) आणि  राजू कुपू पारंडेकर (वय 35, तिघे रा. बिजलीनगर, चिंचवड) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज तीन येथे गणेशनगर ते भोईरवाडी या दरम्यानच्या रस्त्यावरील खांबांवर दिवे लावण्याचे काम सुरु आहे. एका ठेकेदाराचे कामगार आज हे दिवे लावण्याचे काम करत होते. शिडीच्या सहाय्याने कामगार खांबांवर दिवे लावत होते. दुपारी साडेपाचच्या सुमारास कामगारांची दिवे लावण्याची शिडी एका चालू असलेल्या इलेक्ट्रिक लाईनला चिटकली.

यामध्ये शॉक लागून तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर एक कामगार गंभीर जखमी झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी आणि अन्य कामगारांना रुग्णालयात दाखल केले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.