Talegaon Dabhade : इंद्रियांनी अनुभवलेल्या गोष्टींचा परिणाम मनावर होतो -उद्धव महाराज मंडलिक

एमपीसी न्यूज – कितीही लाखांचा पोशाख घातला तरी मनुष्याचे सौन्दर्य काही काळापुरतेच आहे. तो बाह्यरूपाने चिरकाल सुंदर राहू शकत नाही. बाह्यसौन्दर्य गौण आहे. मनुष्य हे गुणांनी सुंदर असू शकतो, तसे संत हे ज्ञानाने सुंदर आहे. वाणीची शोभा नामसमरणात आहे. कानाची शोभा हरिकथा श्रवण करण्यात आहे. नयनाची शोभा भगवंतदर्शन करण्यामध्ये आहे. प्रत्येक इंद्रियानी अनुभवलेल्या गोष्टींचा परिणाम हा मनावर होत असतो. तसे दर्शनाचा परिणाम हा मनापर्यंत होत असतो, परमात्मा गुणसमुद्र आहे त्याच्या चरित्राचे वर्णन करणे अशक्य आहे, त्याच्या दर्शनाने भक्ताला दुसरे कशाचेही स्मरण राहत नाही, असे प्रतिपादन हभप श्री उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.

आमदार सुनील अण्णा शेळके आणि विठ्ठल परिवार मावळच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रथम दिवसाची कीर्तनरुपी सेवा हभप श्री उद्धव महाराज मंडलिक यांनी सादर केली.

मावळ भूमी ही संतांची शूरवीरांची दानशूरांची आहे. याच भूमीतले पुत्र विठ्ठल सेवा करणारे, गोरगरीब ज्येष्ठांचा आधार असणारे, आमदार म्हणून मावळमधून एक दातृत्वशील असं आगळवेगळं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं आहे. आज त्यांच्यामुळेच हा भावभक्तीचा अथांग सागर या कामशेत नगरीमध्ये लोटला आहे. सुनील अण्णा हे केवळ सामान्यांच नेतृत्व नसून सर्वमान्य नेतृत्व आहे, त्यांच्या ह्या विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून समाजाला अध्यात्माची योग्य दिशा मिळत आहे.

अभंगाचे चिंतन सादर करताना महाराज सांगतात की, ७०० वर्षांपूर्वी माउलींनी जाती-धर्मांमधला भेद दूर केला. संत हे केवळ विशिष्ठ जातीपुरते मर्यादित नसून विश्वाच्या कल्याणासाठी अवतरीत होतात. अठरापगड जाती एकत्र करून छत्रपतींनी स्वराज्य उभे केले तस सुनील अण्णांच्या माध्यमातून हा सोहळा सर्वांना विठ्ठलभक्ती नामस्मरणासाठी विशेष पर्वणी आहे.

परमात्मा हा एकमेव आद्यपुरुष आहे, ही सृष्टी तसेच मनुष्यदी जीव प्रकृतीच्या अधीन आहे. सकळ विश्वाचे सूत्र त्या परमात्म्याच्या हाती आहे. अशा या भगवंताची भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. ही भक्ती करत असताना भक्ताकडे एकनिष्ठ भाव असणं महत्वाचे आहे. अध्यात्मामध्ये स्त्री-पुरुष, जातीभेद, उच्च-नीच मानलं जातं नाही.

भगवंताचा अवतार हा सावळ्या स्वरूपाचा आहे. पण, माऊली त्यांना पंढरपूरचा निळा, असे वर्णन करतात. आकाश हे निळयारंगाचे दिसते परंतु त्याला कोणताही रंग नाही, ते अथांग आहे व्यापक आहे. जे निराकार आहे ते निळे भासते. तसेच भगवान परमात्मा निर्गुण निराकार व विश्वव्यापक आहे म्हणून आद्यगुरू श्री शंकराचार्य पासून ज्ञानदेवांना देखील पांडुरंग निलस्वरूपात दिसतो तो त्याच्या निराकारतेमुळेच. जगाचे सौन्दर्य एकत्र केले तरी भगवंताच्या नखाचीही सर त्याला येणार नाही.

त्या भक्ताला भगवतभेटीचा ध्यास लागतो हा त्या दर्शनाचा परिणाम आहे. एकही क्षण त्याच्याशिवाय राहू शकत नाही. जे सदविचार, सद्विवेक सत्कर्म सोडतात. त्यांच्या जीवनात दुःखाची अमावस्या आल्याशिवाय राहत नाही, म्हणून परमात्म्याची अनन्य भक्ती ही सर्वश्रेष्ठ असून ती दृढ ठेवली पाहिजे.
ही अनन्यता दृढ राहिली पाहिजे. एकनिष्ठ भाव समर्पक राहिला पाहिजे. त्या एकमेव परमात्म्याशिवाय दुसरा कोणी तारक नाही, असे महाराजांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.