Hinjawadi : डोक्यात वार करून ट्रक चालकाला लुटले

एमपीसी न्यूज – जकात नाक्यावर थांबल्यावर ट्रकचे टायर पंक्चर झाल्याची खात्री करत असताना दोन जणांनी ट्रक चालकाच्या डोक्यात वार केले आणि त्याच्या खिशातून 6 हजार 500 रुपये चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 1) पहाटे वाकड ब्रिजजवळ घडली.

राम राईस यादव (वय 38, रा. न्हावा शेवा, मुंबई) असे जखमी ट्रक चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव ट्रक चालक आहेत. ते सोमवारी पहाटे देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरून जात होते. वाकड ब्रिज येथे आले असता त्यांनी ट्रक थांबवला आणि चाक पंक्चर झाले असल्याची खात्री करू लागले. दरम्यान, एका पांढ-या मोटारीतून दोनजण आले. त्यांनी यादव यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केले. यामध्ये यादव गंभीर जखमी झाले. चोरट्यांनी यादव यांच्या खिशातून 6 हजार 500 रुपये जबरदस्तीने चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.