Pimpri: प्रभाग समितीची बैठक झालीय ‘समोसा’ पार्टी; बैठकच बंद करण्याची भाजप नगरसेवकाची मागणी

क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी गैरहजर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ प्रभागाच्या सोमवारी (दि. 1)आयोजित केलेल्या बैठकीला क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहिल्याने सत्ताधारी भाजप नगरसेवकाने संताप व्यक्त केला. अधिकारी उपस्थित राहणार नसतील तर आम्ही काय ‘समोसा’ खायला बैठकीला यायचे का ?, प्रभाग समितीची बैठक म्हणजे सामोसा पार्टी झाल्याचा आरोप करत प्रभाग समितीची बैठकच रद्द करण्याची मागणी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली.

महापालिकेच्या ‘ग’ प्रभागाची मासिक सभा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेतली जाते. त्यानुसार काल प्रभागाची बैठक आयोजित केली होती. परंतु, यशदा येथे प्रशिक्षण असल्याचे कारण देऊन क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे यांच्यासह एकही अधिकारी बैठकीला हजर नव्हते. त्यामुळे बैठक तहकूब करण्यात आली.

अधिका-यांचे प्रशिक्षण नियोजित होते. तरी देखील प्रभाग समितीची बैठक का ठेवण्यात आली होती ? सभेला अधिकारी उपस्थित राहणार नसतील. तर, मासिक सभा नावाची ‘समोसा’ पार्टी त्वरित बंद करण्यात यावी. जेणेकरुन अधिकारी, कर्मचारी यांचा वेळ व सर्वांसाठी मागविण्यात येणा-या अल्पोपाहाराच्या खर्चाची बचत होईल, अशी मागणी नगरसेवक वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

क्षेत्रिय कार्यालयांमार्फत सुरु असलेल्या कामकाजाच्या माध्यमातून मुलभूत सुविधा नागरिकापर्यंत पोहचविण्यात आपण सार्थ ठरलो आहोत का ? असा प्रश्न पडत आहे. महापालिकेतील विविध विभागातील वरिष्ठ अधिका-यांना या सभेसाठी उपस्थित राहण्यास वेळ मिळत नाही. कोणते तरी कारण काढून अधिकारी बैठकीला गैरहजर असतात, असेही वाघेरे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.