Pimpri News:  शहरामध्ये हॉकर्स झोन विकास करण्यात यावा – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी हॉकर्स झोन निश्चित करून तरुणांना व बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.    

या विषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, मागील दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विविध भागांमध्ये फिरून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाले, पथारीवाले,टपरीवाले,यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तसेच अनेक तरुणांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे.त्यामुळे सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे.समाजातील या बेरोजगार तरूणांना योग्य दिशा देण्याचे काम आपले आहे.

त्यामुळे अश्या अनेक कुटुंबाना तसेच तरूणांना आधार देण्यासाठी क्षेत्रीय स्थरावर सर्वेक्षण करून हॉकर्स झोन विकसित करून त्या ठिकाणी परीसातील फेरीवाले, टपरीवाले,पथारीवाले यांना स्थलांतरित करावे. पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मधील पवनेश्वर मंदिर चौक,डीलक्स चौक तसेच साई चौक येथे महानगरपालिकेच्या वतीने हॉकर्स झोन विकसित करून सदर ठिकाणी महापालिकेच्या वतीने सदर ठिकाणी ८x८ चे गोळे विकसित करून ते बेरोजगारांना भाड्याने दिल्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे व या माध्यमातून रोजगाराची संधी मिळणार आहे तसेच महापालिकेच्या उत्पन्नात देखील भर पडणार आहे.
प्रभाग २१ मधील पवनेश्वर मंदिर चौक, डीलक्स चौक तसेच साई चौक येथे  हॉकर्स झोन विकसित करण्याचे निर्देश संबधित विभागास देण्यात यावे, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.