Hinjawadi : वाहतूक पोलिसांची नजर चुकवून जॅमरसह वाहने केली गायब

एमपीसी न्यूज – वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहनांना जॅमर लावले. वाहतूक पोलिसांचे लक्ष दुस-या कामाकडे जाताच वाहन धारकांनी जॅमरसह वाहने नेली. असे दोन गुन्हे हिंजवडी वाहतूक विभागाकडून दाखल करण्यात आले आहे.

वाहतूक पोलिसांची नजर चुकवून सिग्नल तोडणे, वेगात वाहन चालवून सिग्नल क्रॉस करणे, वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालवायचं आणि वाहतूक पोलीस दिसताच एखाद्या मोठ्या वाहनाच्या आडोशाने पुढे जायचे. असे अनेक प्रसंग चौकाचौकात दिसतात. अनेकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई देखील करण्यात येते. मात्र काही वाहनांना वाहतूक पोलिसांनी जॅमर लावला असता वाहन धारकांनी चक्क जॅमरसह वाहन नेले.

हिंजवडी मधील जॉमेट्रिक चौकात नो एंट्रीमध्ये एका चालकाने त्याची दुचाकी (एम एच 12 / के एच 1191) पार्क केली. वाहतूक पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्या दुचाकीला जॅमर लावला. चालक दुचाकीजवळ नसल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या वाहतूक नियमनाच्या कामात लक्ष वळवले. याचा फायदा घेत दुचाकीस्वार बहाद्दर जॅमरसह दुचाकी घेऊन गेला.

दुस-या एका घटनेत हिंजवडी वाहतूक विभागाजवळ एका ऑटो रिक्षाला (एम एच 12 / जे एच 1770) जॅमर लावला. वाहतूक विभागाजवळ लावलेला रिक्षा जॅमरसह गायब झाला आहे. या दोन्ही घटनांबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.