Shirur : शिरुरमध्ये लोकसभेला अजितदादा आणि शिवाजीदादा यांच्यात सामना ?

शिरुरमधून लोकसभा लढविण्यासाठी अजित पवार तयार

एमपीसी न्यूज – गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीपासून शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला तगडा उमेदवार मिळत नाही. आता खुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरमधून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. आपण शिरुरमधून लढण्यास तयार असल्याचे शरद पवार यांना सांगितले असून त्यांनी आदेश दिल्यास निवडणूक लढविणार आणि निवडून येणारच असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शिरुरमध्ये अजितदादा आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीदादा आढळराव असा सामना होणार का? याचीच चर्चा कालपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पूर्वीच्या खेड आणि 2009 मध्ये पुनर्रचना झालेल्या शिरुर लोकसभा मतदार संघातून दोन वेळा असे सलग तीनवेळा निवडून येण्याचा विक्रम शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केला आहे. त्यांनी तीनही वेळेस राष्ट्रवादीच्या उमेदरावाराचा पराभव केला. आढळराव यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यास राष्ट्रवादीचे आमदार घाबरत असल्याची सातत्याने चर्चा होती. राष्ट्रवादीकडून 2009 च्या लोकसभा निवडणूक विलास लांडे यांनी तर 2014 मध्ये देवदत्त निकम यांनी लढविली होती. त्यांचा आढळराव यांनी पराभव केला होता.

आगामी लोकसभा निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. उमेदवार निश्चित केले जात आहेत. शिरुरमधून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याबाबत चर्चा सुरु असतानाचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि.6)आपण स्वत: लढण्यास तयार असल्याचे सांगत बॉम्ब टाकला आहे. लोकसभेसाठी एकेक खासदार महत्त्वाचा असून, त्यादृष्टीने शिरूरची जागादेखील आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळत नसेल तर मी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे पवार साहेबांना सांगितले आहे. मी जर शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचा फॉर्म भरला तर या मतदारसंघातून निवडणूक जिंकून दाखवीन अन्यथा पवाराची अवलाद सांगणार नाही असेही ते म्हणाले. अजित पवार शिरुरच्या मैदानात उतरल्यास निवडणूक रंगतदार होणार आहे. अजितदादा विरुद्ध शिवाजीदादा असा सामना रंगतो का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.