Mumbai: खलनायिकेचीही भूमिका करायला आवडेल – डॉ. हेमांगी वेलणकर

'चांगली नाटकं लोकांपर्यंत पोहचणंही महत्त्वाचे', 'शन्नां'ची शाबासकी हेच मोठे पारितोषिक'

एमपीसी न्यूज – प्रत्येकाच्या मनात एक सुप्त कलागुण दडलेला  असतो, तो कलागुण कधी ना कधी तरी अचानक प्रकट होतो, तसेच हेमांगी वेलणकर यांच्याबद्दल झालं, मुलीला नाटक शिकवत असताना, अचानकपणे ऑडिशन द्यावी लागली, आणि रंगमंचावर प्रवेश झाला, बालनाट्यामधून सुरुवात केली, आणि मग व्यावसायिक नाटक, मालिका, चित्रपट, अशी वाटचाल सुरू झाली, ही वाटचाल कशी झाली?  त्यांना दिग्दर्शक आणि सहकलाकार यांचे सहकार्य कसे मिळाले हे सगळं आमचे प्रतिनिधी दीनानाथ घारपुरे यांनी जाणून घेतले आहे.

प्रश्न – मला सुरुवातीला सांग तू या नाट्यक्षेत्रात कशी आलीस? आणि याची आवड तुला कधीपासून होती? 

डॉ. हेमांगी वेलणकर – मी 2003 साली नाट्यक्षेत्रात आले, माझे वडील डॉक्टर होते, यांच्याबरोबर मी डॉक्टरकीची प्रॅक्टिस करीत होते, मी नाटकात ओघानेच आले, म्हणजे असं झालं की, माझी मुलगी साडेचार पाच वर्षाची असताना ती शाळेमध्ये सिनियर केजी शिकत होती, त्यांच्या शाळेतील दहा-बारा मुले घेऊन मी एक नाटक बसवले आणि तिचे काम बघून तिच्यामध्ये अभिनयाची गुण आहेत, असे मला जाणवले, आणि तिला मी मुंबईमध्ये बालनाट्याच्या शिबिरासाठी दाखल करण्यासाठी घेऊन आले, त्यावेळी शिबिरामध्ये लोकांनी सांगितलं की, ही खूप छोटी मुलगी आहे,  आमच्या शिबिरांमध्ये आम्ही आता तिला प्रवेश देऊ शकत नाही, पण तुम्हाला नाटकाची आवड असेल तर तुम्ही का प्रयत्न करत नाही? मी यापूर्वी कधीच नाटक केलेलं नव्हतं, ते म्हणाले की तुम्ही ऑडिशन देऊन बघा,  जर जमलं तर तुम्ही भूमिका करा, त्यांच्या सूचनेप्रमाणे मी त्यांच्या बालनाट्यासाठी ऑडिशन दिली, आणि त्यामध्ये माझी निवड झाली, त्यावेळी सुरुवातीला मी बालनाट्यामध्ये काम केले, ते पहिले व्यावसायिक नाटक होतं. प्रयोग शिवाजी मंदिर मध्ये झाला, त्या बालनाट्याचे नाव ‘आम्ही शाळेत जाणारी मुले’ आणि तो प्रयोग बघायला आनंदा नांदोस्कर  यांच्या नाटकाचा मॅनेजर आलेला होता, त्यावेळी त्यांनी विचारलं की, आमच्या नाटकांमध्ये रिप्लेसमेंट कलाकार म्हणून तुम्ही काम कराल का?  खरं सांगायचं तर मला या नाट्यक्षेत्राची काहीच माहिती नव्हती, मी चौकशी केली आणि मग विचार केला की रिप्लेसमेंट परमनंट असेल तर मी काम करीन, त्यांनी होकार दिल्यावर ‘जमलं बुवा एकदाचे’ या नाटकात त्यांनी मला काम दिले.

प्रश्न – तुझी सुरूवात छान झाली पण व्यावसायिक पहिले नाटक कोणते?

डॉ. हेमांगी वेलणकर – तसं बघायला गेलं तर माझं व्यावसायिक पहिलं नाटक होतं ‘काय चाललय गुलू गुलू’. हे नाटक मी सतीश तारे यांच्याबरोबर केलं, पहिली मालिका ‘ऊन पाऊस’, ही मालिका संजय सूरकर यांनी दिग्दर्शित केली होती, माझं ‘सुखवस्तू’ नाटक बघायला स्मिता तळवळकर आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी सांगितले, ‘ऊन पाऊस’ या मालिकेमध्ये आईच्या भूमिकेसाठी तुम्ही काम कराल का? मी त्यावेळी थोडी नाराज होते. त्याचे कारण असे की, त्यानंतर मग त्याच पद्धतीच्या भूमिका मिळत जातात, असा माझा समज होता, पण विजय केंकरे यांनी सांगितलं, ‘तुझी पहिलीच मालिका आहे, कलाकार-दिग्दर्शक चांगले आहे तर त्यामध्ये तू काम कर’.

प्रश्न – दिग्दर्शक आणि सहकलाकारांविषयी काय सांगशील?

डॉ. हेमांगी वेलणकर  – मला नाटकामध्ये खूप चांगल्या दिग्दर्शकांच्या बरोबर काम करायला मिळाले. विजय केंकरे यांच्याबरोबर तीन नाटकांमध्ये मी काम केलं. विजय गोखले, सतीश तारे यांच्याबरोबर काम केले. सतीश तारे सर एक उत्तम दिग्दर्शक, विनोदाचा टाइमिंग सेन्स उत्तम असलेला कलाकार आणि आता सध्या मी संजय पवार यांच्या बरोबर ते दिग्दर्शित करीत असलेल्या ‘बाई वजा आई’ या नाटकात मी काम करत आहे. प्रत्येक दिग्दर्शकाची शैली वेगवेगळी असते, विजय केंकरे, विजय गोखले, सतीश तारे, संजय पवार, त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले आणि सहकलाकार म्हणून रिमा लागू यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले, मी त्यांच्याबरोबर ‘तुझी माझी जोडी’ या नाटकात काम केलं होतं,  मी अगदीच नवीन कलाकार होते त्यावेळेला, पण त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं, त्याचबरोबर मोहन जोशी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

प्रश्न – पारितोषिकांविषयी काय सांगशील ?

डॉ. हेमांगी वेलणकर – पारितोषिकांविषयी सांगायचं तर, मला पारितोषिकं तशी काही मिळाली नाही,  पण मी ‘सुखवस्तू’ नाटकात काम केलं होतं त्यासाठी तालमी मला खूप कमी मिळाल्या, त्यामुळे काम करताना थोडी धाकधूक  होती, या नाटकात मी ‘सोनाली’ची भूमिका करायचे, पण त्या भूमिकेसाठी मला शं. ना. नवरे यांच्याकडून शाबासकी मिळाली, हे माझ्यासाठी खूप मोठे पारितोषिक आहे.


प्रश्न – तू केलेल्या मालिका, नाटके,  आणि चित्रपट कोणते?

डॉ. हेमांगी वेलणकर – मी केलेल्या मालिका म्हणाल तर, ऊन पाऊस, वहिनीसाहेब, उंच माझा झोका, कृपासिंधू  आणि चित्रपटांमध्ये मातीच्या चुली,  मुन्नाभाई एस एस सी, खरं सांगेन खोटं खोटं आणि सनई चौघडे यांचा समावेश आहे. आम्ही शाळेत जाणार नाही, जमलं बुवा एकदाचं, काय चाललंय गुलु गुलु, ह्यांचं हे असंच असतं, सगळ्या लटपटी लग्नासाठी, सासू-सुनेनं घातला गोंधळ, तुझी माझी जोडी, नटसम्राट, सुखवस्तू, वराड आलंय लंडनहून, सर्किट हाऊस, बाई वजा आई या नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

प्रश्न – तू  वेगवेगळ्या भूमिका केल्यास , कोणत्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतील?

डॉ. हेमांगी वेलणकर – मला सगळ्याच भूमिका चांगल्या प्रकाराने करायला आवडतात. मी जर पुरुष असते, तर मला ‘चार्ली चॅप्लिन’ ची भूमिका करायला नक्कीच आवडलीअसती, पण आता एखादी उत्तम अशी स्त्री व्यक्तिरेखा करायला मला नक्कीच आवडेल,  त्याचप्रमाणे निगेटिव्ह व्यक्तिरेखा म्हणजे खलनायिका करायला सुद्धा मला जास्त आवडेल.

प्रश्न – नाट्य क्षेत्रातील अनुभवाविषयी काय सांगशील?

डॉ. हेमांगी वेलणकर – मी नाट्यक्षेत्रामध्ये आले, त्यावेळी मला या नाट्यक्षेत्राची काहीच माहिती नव्हती,  माझ्या कुटुंबात सगळेच डॉक्टर आहेत,  वडील डॉक्टर, काका डॉक्टर, बहीण डॉक्टर, मी स्वतः डॉक्टर, त्यामुळे मला या क्षेत्राची काहीच माहिती नव्हती, पण मला माझ्या नशिबाने एका कामातून दुसरी कामं मिळत गेली, बालनाट्यापासून सुरुवात झाली ती पुढेपुढे चांगली व्यावसायिक नाटके मिळत गेली, आणि तशाच मला मालिका सुद्धा मिळत गेल्या, अनुभव काय आणि कसा आला असं म्हणाल तर, नाटकात किंवा सिनेमात तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला चांगलेच काम करावे लागते, तुमचा तुमच्या कामावर विश्वास पाहिजे, अर्थात तुमचे कामच अधिक काही सांगून जाते, एक काम सुरू असताना पुढील काम मिळत जाणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे, तुम्हाला या क्षेत्रात संघर्ष हा करावाच लागतो, पण तुम्ही तो कसा घेता यावर सगळं अवलंबून आहे,  आता माझं  ‘बाई वजा आई’ हे नाटक रंगभूमीवर आहे सुरू आहे.

प्रश्न  – आजचे नाटक आणि आजचा प्रेक्षक यांच्याविषयी तुझं काय मनोगत आहे?

डॉ. हेमांगी वेलणकर – आजची व्यावसायिक नाटकं चांगली आहेत, पण नाटक चालणे हा भाग वेगळा, नाटक चालणे हे निर्माते आणि प्रेक्षक यांच्यावर अवलंबून असते, कलाकार चांगले आहेत, नाटक चांगले आहे, पण कधीकधी बुकिंग होत नाही,  असं का होतं याविषयी नक्की कोणी काहीच सांगू शकत नाही , प्रायोगिक नाटकांचे विषय चांगले असतात, ती लोकांनी जरूर बघावे, मुख्य म्हणजे लोकांनी नाटक जरूर बघणे हे खूप महत्त्वाचे आहे. आजकाल लोकांकडे मनोरंजनासाठी अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. चांगली नाटकं लोकांपर्यंत पोहोचणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी सगळेजण प्रयत्न करीत असतात, माऊथ पब्लिसिटी ही जास्त गरजेची आहे आणि त्यामुळे लोकांपर्यंत नाटक पोहोचते आणि त्यातूनच प्रेक्षक थिएटरपर्यंत येऊ शकतो.

दीनानाथ घारपुरे

9930112997

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.