Mumbai: जागतिक चित्रपटांतही मराठी चित्रपटांनी राखलाय चांगला दर्जा – दिग्दर्शक संजीव कोलते

नामवंत चित्रपट दिग्दर्शक संजीव कोलते यांची प्रदीर्घ मुलाखत

एमपीसी न्यूज – चित्रपट क्षेत्राचे आकर्षण हे प्रत्येकालाच असते, तसे ते संजीव कोलते यांनाही होते, या क्षेत्रात येऊन उत्तम कामगिरी करायची या विचाराने ते झपाटलेले होते, सुरवातीला मुंबईला येऊन नोकरी केली, मुंबईत आल्याने चित्रपट क्षेत्रात जाण्यासाठी त्यांची धडपड सुरु झाली, कथा, पटकथा, संवाद लेखन करता करता दिग्दर्शन कसे करतात याचे धडे त्यांनी मनापासून, आत्मविश्वासाने स्वतःच शिकून घेतले, आज ते नामवंत दिग्दर्शक आहेत, त्यांचा हा सर्व प्रवास प्रेरणा देणारा आहे, हे सारे त्यांच्याकडूनच जाणून घेतले आहे, आमचे प्रतिनिधी दीनानाथ घारपुरे यांनी!

1.  चित्रपट क्षेत्रात यावे, असे आपणास का वाटले? अर्थात याची सुरवात कशी झाली?

उत्तर : मी मुळात नागपूरचा आहे. माझ्या कुटुंबातील सगळेच उच्च शिक्षित. सगळे कॉमर्स चे पदवीधर. मात्र मी कधीही अभ्यासात रमलो नाही. खेळात माझं लक्ष असायचं. त्याकाळी म्हणजे 1973 ते 1978 ह्या काळात, मी गणपती उत्सव, शारदोत्सवात नाटकातून, एकांकिकांमधून काम करू लागलो. आणि मला नाटकात काम करणे खूप आवडू लागलं. दहावी झाल्यावर मी कॉलेजमध्ये पण नाटक बसवायचो, अभिनय करायचो, लिखाण, दिगदर्शन करायचो आणि नाट्यक्षेत्राची अशी काही गोडी लागली की मी संपूर्णपणे स्वतःला नाट्यक्षेत्रात वाहून घेतले. अर्थात नागपुरात हौशी रंगमंचावर काम करून मी नाव आणि बक्षिसे मिळवली, पण वेड लागलं होतं ते व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्राचं! आणि ओढ लागली मुंबईची! अर्थात माझ्या या वागण्याला नागपुरातील सर्व मित्र, नातेवाईक “वेडा झालाय हा” असंच बोलत. माझा कोणी गॉड फादर नव्हता की फिल्म इंडस्ट्रीत कोणी ओळखीचं नव्हतं, पण मी संकल्पच केला होता आणि तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर मार्ग मिळतोच. तसा मला मार्ग मिळाला. 1980 साली मला मध्य रेल्वेमध्ये मुंबईत नोकरी लागली आणि मी आनंदानी वेडा झालो. नोकरी लागल्यामुळे घरचे पण गप्प झाले होतो, आणि मी मुंबई गाठली. अपार श्रम, खूप मेहनत, स्ट्रगल करून व्यावसायिक नाटकात काम मिळवलं. नोकरी फक्त मुंबईत येण्याचं एक कारण होतं. ध्येय नाटक, चित्रपट हेच होतं. आणि माझ्या मुंबईतील नाट्य, चित्रपट प्रवासाला सुरवात झाली.

 

2.  दिग्दर्शन  क्षेत्रात यायचे म्हणजे या आधी कोणाकडे सुरवातीला प्रशिक्षण घेतले का ? सहायक म्हणून काम केलं का ?

 

उत्तर :  नाही. मी कधीही कुणाचा सहायक म्हणून काम केलं नाही. मी अभिनेता होतोच. काम करताना मी सेटवर खूप बारकाईने शॉट टेकिंगचा अभ्यास करायचो. शिवाय मी कथा, पटकथा ,संवाद लेखक होतोच. मी बघून शिकत गेलो आणि सुदैवाने संधी मिळत गेली. माझ्याजवळ हौशी आणि व्यावसायिक नाटकांमध्ये आणि मालिकांमध्ये काम करण्याचा खूप अनुभव होता. स्क्रिप्टची उत्तम समज मला होती. तांत्रिकदृष्ट्या मी शिकत गेलो. आणि मराठी, हिंदी मालिकांचं लिखाण आणि दिगदर्शन करायला लागलो. ‘निषकृती’, ‘जागते रहो’, ‘तालिया’ या सारख्या मराठी हिंदी मालिकांमध्ये मी 1989-90 साली प्रवेश केला. पुढे पहिला मराठी चित्रपट ‘गृहलक्ष्मी’ आणि हिंदी फिल्म ‘एक पल प्यार का’ असे दोन्ही चित्रपट एकाच वेळी सुरू झाले.

 

3.  तुम्ही व्यावसायिक नाटकात काम करीत होतात मग अभिनय करताना दिग्दर्शन करावे असे का वाटले ? तसेच दिगदर्शन करावे की अभिनय सुद्धा करावा असे वाटले?

 

उत्तर : अभिनय करायला मी खूप संघर्ष केला. नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये भूमिका पण केल्यात, पण म्हणाव्या तशा भूमिका मिळत नव्हत्या. उगीच लहान-सान रोल करण्यात समाधान मिळत नव्हतं. मी तर कलाक्षेत्रात काम करण्यासाठी नोकरी पण सोडून बसलो होतो. पूर्ण वेळ कलाक्षेत्रातच काम करत होतो. अर्थात अभिनयाची आवड आज पण आहेच. पण व्यवसाय म्हणून त्यावेळी मला लेखन आणि दिगदर्शन निवडणं गरजेचं वाटलं. शिवाय काम पण उत्तम मिळत होते. शेवटी कलाकाराला त्याच्या आवडत्या क्षेत्रात सातत्याने काम मिळणं खूप महत्वाचं असतं. आणि मी लेखक दिग्दर्शक म्हणून करियर निवडलं आणि आज गेली 37 वर्ष मी काम करतो आहे. जवळपास 25 चित्रपट मी लिहून दिग्दर्शित केलेत आणि हजारो एपिसोड लिहून अनेक मालिका पण दिग्दर्शित केलेल्या आहेत.

 

4. दिग्दर्शन करण्याच्या इच्छेने तुम्ही आलात मग तो प्रवास सांगा? आणि पहिला कोणता चित्रपट दिग्दर्शित केला? 

 

उत्तर :  मी खूप भाग्यवान आहे. मला चित्रपट दिग्दर्शनाची पहिली संधी देणारे दोन निर्माते आहेत. मी एका पेक्षा एक दर्जेदार सिरीयल लिहून दिग्दर्शित करीत असतानाच, माझी भेट बी. राजेश या निर्मात्याशी झाली. ते माटुंग्याला रहात होते. मी त्यांना कथा ऐकवली. ती त्यांना खूप आवडली आणि ‘गृहलक्ष्मी’ चित्रपटाला सुरवात झाली. माझे जवळचे मित्र, मैत्रिणी म्हणजे रमेश भाटकर, अलका कुबल, प्रिया बेर्डे असे कलाकार त्यात होते.  अच्युत ठाकूर सारखे नामवंत संगीतकार लाभले, गाणी जगदीश खेबुडकरांनी लिहिली. मी खूप भाग्यवान की जगदीश खेबुडकरांसोबत मला काम करण्याची संधी दोन चित्रपटांत मिळाली.  ‘गृहलक्ष्मी’ची बोलणी सुरू असतानाच, एक खूप जाणते, ‘अंकुश’ सारख्या चित्रपटाचे निर्माते सुभाष दुरुगकरांनी मला हिंदी फिल्म ऑफर केली. ‘एक पल प्यार का’ ही फिल्म शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे असे कलाकार घेऊन सुरू झाली. असा मी भाग्यवान की पदार्पणातच माझ्या दोन फिल्म्सचे काम सुरू झाले, एक हिंदी आणि एक मराठी!

 

5. नवनवीन विषय आज आपल्या समोर येत आहेत, तुम्ही चित्रपट निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करता?

 

उत्तर : आजवर मी 25 चित्रपट केले आहेत. सामाजिक, कौटुंबिक, थरारपट, विनोदी असे अनेक प्रकार फिल्म मेकिंगमध्ये आहेत. मी जवळपास सगळेच प्रकार हाताळलेत. पण सर्वात महत्वाचं म्हणजे ‘कथा बीज’ हे उत्तम असायलाच हवं. संहिता जितकी कसदार असेल, तितकी कलाकृती ही परिणामकारक बनते. कथा, लिखाण, पटकथा, संवाद हा चित्रपटाचा आत्मा आहे. असं म्हणतात की, चित्रपट हा कागदावर उत्तम साकारला गेला तर आणि तरच तो सिनेमाच्या पडद्यावर उत्तम परिणाम देऊ शकेल. अर्थात दिगदर्शन, कलाकार, संगीत, फोटोग्राफी या पण महत्वाच्या गोष्टी आहेतच. ही सर्व चित्रपटाची आभूषणे आहेत. मुळात आत्मा सुंदर असेल तर सुंदर आकृती बनेल, मग ती सजवली तर अप्रतिम होणारच.

 

6. कथा निवड झाल्यावर कलाकारांच्या निवडीकडे तुम्ही कसे बघता अर्थात कलाकारांची निवड?

 

उत्तर :  उत्तम कथा महत्वाची. सशक्त कथेत तशी मजबूत पात्र रेखाटल्या जातात. कथेतील पात्राला न्याय देणारा कलाकार मी शोधतो. आधी तुम्ही स्टार घेतलात मग त्याला कथेतील पात्रात फिट्ट बसवायचा प्रयत्न केला, तर ते गणित कथेप्रमाणे जमणे कठीण होते, कथेतील पात्रांना जिवंत साकारणारे नट महत्वाचे असतात. मी माझ्या कथेतील पात्र ज्या कलाकारांत असेल त्याला घेऊन फिल्म करतो. अचूक पात्रयोजना हे चित्रपट यशाचं फार मोठं गणित आहे. हे गणित फसले, मिसकास्ट झालं तर चित्रपट डब्यात जातो.

 

7. आत्तापर्यंत तुम्ही कोणकोणत्या भाषेमधील चित्रपट दिग्दर्शित केले? आणि साधारण किती चित्रपट आहेत तसेच लवकरच प्रदर्शित होणारे नवीन चित्रपट कोणते आहेत?

 

उत्तर : मी आतापर्यंत मराठी, हिंदी, गुजराथी, भोजपुरी अशा 25 पेक्षा जास्त चित्रपट लेखक/ दिगदर्शक म्हणून केले आहेत. अजूनही करतो आहे. ‘तानी’, ‘कॅम्पस कट्टा’, ‘गृहलक्ष्मी’, ‘देवा शप्पथ खोटं सांगीन’, ‘इंदू’, ‘माझी मैत्रीण’, ‘विठू माझा भाऊराया’, ‘रंगकर्मी’, ‘फुल्ल टू धम्माल’, ‘पिलांतररू’, ‘एक पल प्यार का’ हे आतापर्यंतचे प्रमुख चित्रपट असून ‘अंजना’, ‘सिक्स प्लस सिक्स’, ‘अशी ही भन्नाट भिंगरी’, हे माझे आगामी चित्रपट आहेत.

 

8. चित्रपट निर्माण करायचा म्हणजे निर्माता, कलाकार, कॅमेरामन, संगीत, तसेच इतर तांत्रिक बाजू हव्यातच, तसेच बजेट हे महत्वाचे असते, त्याच बरोबर वितरण आणि प्रसिद्धी या विषयी काय सांगाल?

 

उत्तर :  साधारणतः दिग्दर्शक हा त्याच्या पूर्ण टीम सोबतच काम करतो. कारण फिल्म मेकिंग म्हणजे कलेक्टिव्ह आर्ट आहे. अनेक विभागातील तंत्रज्ञ एकत्र काम करतात. संगीत, छायाचित्रण, डान्स, मेकअप अनेक विभाग आहेत. सहसा नेहमीच्या माझ्या माणसांसोबत मी काम करतो कारण मला काय हवं आहे, हे त्यांना अनेक वर्षे सोबत काम करून समजलेलं असतं, प्रत्येक चित्रपटाची मागणी वेगवेगळी असते. लोकेशन्स वेगळ्या असतात, कलाकार पण त्या त्या भूमिकेत फिट्ट बसणारे लागतात, यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे निर्मात्याचं बजेट, कथेप्रमाणे बजेट असावं लागतं, म्हणजे ऐतिहासिक फिल्म काही तुटपुंज्या बजेटमध्ये होणार नाही आणि कोणी केलीच तर हवा तो परिणाम साध्य होणार नाही.

 

सर्वात महत्वाचं असतं ते बजेट.  निर्मात्यांनी दिलेल्या बजेटमध्ये उत्तम कलाकृती निर्माण करण्यासाठी दिग्दर्शक त्याच्या टीम सोबत मेहनत घेत असतो. निर्मात्याला हेही समजावून आम्ही सांगतो की, नुसती चित्रपट निर्मिती करून काम होणार नाही, तर चित्रपट योग्य जाहिरातीसह चित्रपटगृहात प्रदर्शित होणं, हे सर्वात जास्त महत्वाचं असतं. फिल्म उत्तमरित्या प्रदर्शित झाली तर आणि तरच कलाकारांच्या गुणांचं कौतुक होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिल्म पोहचली तरच निर्मात्यानी लावलेले पैसे परत मिळण्याची अपेक्षा राहील, आम्ही दिग्दर्शक निर्मात्याला फिल्म सुरु करण्यापूर्वीच कल्पना देत असतो की, फिल्म मेकिंग सोप्पं आहे पण फिल्म रिलीज करणं, फिल्म घराघरात पोहचवणे खूप महत्वाचे आहे, त्यामुळे फिल्म निर्मिती सुरू करण्यापूर्वीच फिल्म रिलीजचं बजेट बाजूला ठेवायला हवं, कारण निर्मात्यांनी गुंतवलेला पैसा हा परत मिळाला तरच निर्माता जगेल आणि एक निर्माता जगला की 125 माणसांचं घर चालतं. शेकडो माणसं जगतात.

 

9. आजच्या चित्रपटांविषयी आपले काय मत आहे?

 

उत्तर : आज मराठी चित्रपटांना भारतातील फिल्म जगात फार मानाचं स्थान आहे, जागतिक चित्रपटांत पण मराठी चित्रपटांनी आपला दर्जा राखला आहे. काळाप्रमाणे नवीन प्रयोग, नवीन कथा येत आहेत आणि त्या छान आहेतच. सातत्याने नवीन विषय यायला हवेत, चित्रपट हे मनोरंजनाचं साधन असलं तरी प्रबोधन करण्याचं मोठं व्यासपीठ पण आहेच. मी देखील आजच्या जनरेशनला आवडतील, त्यांना जवळचे वाटतील अशा विषयांवर चित्रपट करतो आहे, काळाप्रमाणे बदलायला हवं. आज  प्रश्न  वेगवेगळे आहेत. दृष्टिकोन बदलतो आहे, पण संस्कृती, पाळंमुळं तर तीच आहेत. वरवरचं रूप बदलतंय पण आत्मा मराठमोळाच आहे आणि तो राहील. नवीन विषय हाताळताना आव्हान वाटतंय. आजचा प्रेक्षक खूप समजूतदार आहे. कॉम्प्युटर, सेल फोन, लॅपटॉपवर जगणारी ही पिढी आहे. मॉल, कॅफे, पब संस्कृतीत वाढतेय, पण उत्तम कथानकं, उत्तम चित्रपट आवर्जून बघतात ही तरुण मूलं. मराठी फिल्मचा दर्जा उत्तम होताच. तो पुढेही राहो ही सदिच्छा!

 

– दीनानाथ घारपुरे, मुंबई
संपर्क क्रमांक – 9930112997

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.