Pune : उध्दव ठाकरे यांना आमदार करण्यासाठी एवढी घाई का ? – चंद्रकांत पाटील यांचा सवाल

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पदाला 28 मे 2020 पर्यंत कोणताही धोका नाही. त्यामुळे त्यांना आमदार करण्यासाठी एवढी घाई का?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

राज्यपाल कोट्यात एका दिवसात निर्णय घेता येईल. पण, महाविकास आघाडीकडूनच या विषयाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. उद्धव ठाकरे यांना आमचा विरोध नाही किंवा त्याला हरकत देखील नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

यापूर्वी भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी उध्दव ठाकरे यांना तातडीने विधान परिषदेवर घेण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे कोरोनाची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळत आहे, असेही काकडे म्हणाले होते. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, सध्याची वेळ राजकारण करण्याची नाही. राज्यात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीसाठी राज्यपालांकडे शिफारस करणे बरोबर नाही.

दरम्यान, राज्य शासनाने उत्तर प्रदेश, बिहार व मध्य प्रदेश या राज्यांमधील परप्रांतीय कामगारांना बसेसमधून त्यांच्या राज्यांमधे पाठवावे. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग करावा, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.