Mumbai : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू

Implementation of Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme resumes. पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन.

एमपीसी न्यूज – मार्च 2020 मध्ये राज्यातील काही जिल्ह्यात निवडणूक जाहीर झाल्यामुळे लागू झालेली आचारसंहिता आणि त्यानंतर कोविड-19 या महामारीमुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची प्रक्रिया बंद झाली होती. काही महिन्यांच्या विसाव्यानंतर कर्जमुक्तीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 32.90 लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती.

20 जुलै 2020 अखेर 27.38 लाख खातेदारांना 17 हजार 646 कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. म्हणजेच योजनेअंतर्गत एकूण प्रसिद्ध केलेल्या पात्र खातेदारांच्या यादीतील 83 टक्के खातेदारांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे.

महात्मा जोतिराव फुले  शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीसाठी पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ देण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

योजनेत ज्या पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ देणे बाकी आहे त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबविली जावी, जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी 21 हजार 467 कोटी रुपयांची आवश्यकता होती. त्यापैकी 17 हजार 646 कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेतून देण्यात आला आहे.

योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी गावपातळीवर ग्रामपंचायतींमध्ये तसेच बँकांच्या शाखा स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यापैकी 2019-20 या आर्थिक वर्षात जवळजवळ 19 लाख खातेदारांना 11 हजार 993 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला होता तर 2020-21 या आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण 5 हजार 653 कोटी रुपयांची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत निर्गमित केलेल्या यादीतील उर्वरित 5.52 लाख खातेदारांनी त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर त्यांना योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ मिळेल व त्यांच्या कर्जखात्यावर रक्कम जमा होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.