Hinjawadi : वायरमनच्या कामात अडथळा; पितापुत्रांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विज खांबाच्या दुरुस्तीचे काम करणा-या वायरमन आणि त्याच्या सहकाऱ्यांना रस्त्याने जाणा-या पितापुत्राने मारहाण केली. यामुळे वायरमनने पितापुत्रावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. हा प्रकार गुरुवारी (दि. 27) सकाळी साडेदहाच्या सुमारास हिंजवडी माण सार्वजनिक रोडवर घडला.

नानासाहेब पंडित जेवे (वय 39, रा. मथुरा कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार साहेबराव कुंडलिक ओझरकर आणि महेश साहेबराव ओझरकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी माण सार्वजनिक रोडवर विजेचा खांब खाली पडला. त्यामुळे खांबावरील तारा खाली पडल्या. या तारांचे दुरुस्तीचे काम नानासाहेब आणि वरिष्ठ वायरमन नथू पवळे, तानाजी काकनाळे हे तिघेजण करीत होते. काम सुरु असताना ओझरकर पितापुत्र दुचाकीवरून जात होते. ते जात असलेल्या रस्त्यावर तारा पडलेल्या होत्या. त्यामुळे नानासाहेब यांनी ओझरकर यांना पुढे तारा पडल्या असून पुढे जाऊ नका असे सांगितले. तरीही दोघेजण पुढे गेले आणि त्यांना तारा लागल्या. यावरून दोघांनी नानासाहेब आणि त्यांच्या सहका-यांना मारहाण केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.