IPL 2020 : दिल्लीचा पाचवा विजय, राजस्थानवर 46 धावांनी मात

एमपीसी न्यूज – आयपीएलच्या तेराव्या हंगामात दिल्ली कॅपिटलची विजयी घोडदौड सुरूच आहे. दिल्लीने शुक्रवारी शारजाच्या‌ मैदानावर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 46 धावांनी मात केली आहे. दिल्ली कॅपिटलचा या हंगामातील हा पाचवा विजय ठरला असून त्यांनी पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे.

दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 184 धावा केल्या होत्या. राजस्थानच्या संघाला मात्र 185 धावांचे आव्हान पार करता आले नाही. त्यांचा संपूर्ण डाव 19.4 षटकात 138 धावांतच संपुष्टात आला. चार षटकांत 22 धावा देऊन 2 बळी घेणाऱ्या अश्विनला सामनावीर ठरला.

दिल्लीने दिलेल्या 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाकडून कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. सलामीवीर जोस बटलर 13 धावांत बाद झाला.

स्टीव्ह स्मिथने तडाखेबाज खेळीला सुरूवात केली होती, पण तो 17 चेंडूत 24 धावा करून झेलबाद झाला. त्यानंतर संजू सॅमसन आणि महिपाल लोमरोर झटपट बाद झाले. चांगली सुरूवात मिळालेला जैस्वाल 34 धावा काढून बाद झाला.

 

त्यानंतर राहुल तेवातियाने एक बाजू लावून धरली. तर दुसरीकडे अँड्र्यू टाय, श्रेयस गोपाल आणि आर्चर लगेच बाद झाले. तेवातिया 38 धावांवर त्रिफळाचीत झाला व राजस्थानचा 46 धावांनी पराभवाला झाला. दिल्लीकडून रबाडा 3, अश्वीन व स्टॉयनीसने 2-2 तर अक्षर पटेल, हर्षल पटेल व नाॅर्ट्झे यांनी 1-1-1 गडी बाद केला.

सुरवातीला फलंदाजी करताना दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे दोघेही स्वस्तात माघारी परतले. आर्चरने धवनला 5 धावांवर तर पृथ्वी शॉला 19 धावांवर बाद केले. त्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोघांमध्ये चांगली भागीदारी होईल अशी अपेक्षा होती पण अय्यर 17 चेंडूत 22 धावा काढून बाद झाला.

अय्यर बाद झाल्यानंतर ऋषभ पंत 5 धावा काढून लगेचच धावबाद झाला. मात्र, मार्कस स्टॉयनीस व शिमरॉन हेटमायरने धमाकेदार खेळी करत दिल्लीचा डाव सावरला. स्टॉयनीसने 4 षटकार मारत 30 चेंडूत 39 धावा कुटल्या. तर शिमरॉन हेटमायरने 5 षटकारांसह 24 चेंडूत त्याने 45 धावा केल्या. त्यानंतर अक्षर पटेलने 8 चेंडूत 17 धावांची खेळी करत संघाला 180 पार नेले.

राजस्थानच्या जोफ्रा आर्चर याने सर्वाधिक तीन तर कार्तिक त्यागी, राहूल तेवतिया व अन्ड्रु ट्ये यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.