Khed News: शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज – खेड-आळंदीचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोनामुळे आज (शनिवारी) सकाळी निधन झाले. मागील 20 दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. आज सकाळी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुरेश गोरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद देखील भूषविले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. खेड-आळंदी मतदारसंघातून ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडणून आले होते. राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते यांचा पराभव त्यांनी केला होता.  पाच वर्षे त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गोरे यांचा पराभव झाला होता.

मागील 20 दिवसांपूर्वी सुरेश गोरे यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवस त्यांनी चाकण येथील रुग्णालयात उपचार घेतले. त्यांनतर त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. उपचारादरम्यान त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांना दुसरे कोणतेही आजार नव्हते. कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

शिवसेनेच्या शिरूर जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे म्हणाल्या, सुरेशभाऊ अजातशत्रू होते. शांत, संयमी, मनमिळाऊ होते. हसतमुख व्यक्तीमत्व होते. जनतेच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असत.  त्यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. शिवसेना परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. गोरे कुटूंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.