Chakan News : साईबाबा पतसंस्था निवडणूक; बोगस मतपत्रिका प्रकरणी गुन्हा दाखल

अनेकांना चौकशीच्या नोटीसा

एमपीसी न्यूज – साईबाबा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या निवडणुकीतील घोटाळा प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan News) फसवणुकीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. ३० एप्रिल) रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 
साईबाबा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेसाठी 23 एप्रिलला चाकण (Chakan News) येथील श्री शिवाजी विद्यालयात मतदान झाले. मात्र सायंकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर प्रत्येक प्रवर्गातील मतदानाचा शिक्का मारलेल्या बोगस मतपत्रिका येथे आढळून आल्या. संपूर्ण मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया प्रशासनाला हाताशी धरून बोगस पद्धतीने राबवण्यात आल्याची बाब समोर आली. त्यानंतर मतमोजणी थांबण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून सर्व मतपत्रिका जप्त केल्या होत्या.  तेव्हापासून संस्थेचे काही माजी संचालक आणि हितचिंतक या प्रकरणी कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करत होते.

साईबाबा पतसंस्था पंचवार्षिक निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी एस.एम. धादवड यांनीच या प्रकरणी चाकण पोलिसांत वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांनी दिली.
आता या संपूर्ण प्रकरणात स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी धादवड यांच्यावर मोठे आरोप होत असल्याने ते संशयाच्या भोवऱ्यात आहेत. सहायक सहकार निबंधक व वरिष्ठांच्या लेखी आदेशानंतर देखील धादवड यांनी गुन्हा दाखल करण्यास चार ते सहा दिवस टाळाटाळ केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी धादवड यांना मदत करणारे व यासाठी आर्थिक तडजोडी आणि मतदान केंद्रावर थांबून काही कॅमरे मुद्दाम बंद करणारे, बोगस मतपत्रिका मतमोजणीच्या ठिकाणी आणणारे व ही संपूर्ण यंत्रणा मतदान स्थळी थांबून राबवणारे अशा सर्वांवर कारवाई करण्याची मागणी या निवडणुकीतील उमेदवार युवराज काळडोके, अनिल सोनवणे, अनिल देशमुख, प्रकाश वाडेकर, अमोल घोगरे, ज्योती गरुड, बाबा जगताप, आदींसह साईबाबा पतसंस्थेच्या सभासदांनी केली आहे.

दरम्यान चाकण (Chakan News) पोलिसांकडून आणि सहायक सहकार निबंधक खेड यांच्याकडून या प्रकरणी अनेकांना चौकशीसाठी नोटीसा बजावल्या आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर काही जन पसार झाले असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.