Kamshet Murder News : शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील मोरमारवाडी ते करंजगाव रस्त्याच्या साईडपट्टीवर एका तरुणाच्या डोक्यात, तोंडावर आणि हातावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना शनिवारी (दि. 11) रात्री उघडकीस आली. याबाबत कामशेत पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर सुरेश तंबोरे (वय 28, रा. कंरजगाव, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पप्पु सुरेश तंबोरे (वय 32, रा. करंजगाव, ता. मावळ) यांनी याबाबत कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत किशोर हा कान्हेफाटा येथील सुप्रीम कंपनीत काम करत होता. त्याच्या कंपनीत कामगारांना घरी ने-आण करण्यासाठी बसची सोय नसल्याने तो दुचाकीवरून कामावर जात असे. शनिवारी किशोर याची सेकंड शिफ्ट होती. त्यामुळे तो द्पारी दोन वाजता घरातून कामासाठी गेला.

फिर्यादी हे देखील कान्हेफाटा येथील एका कंपनीत काम करत असून त्यांचीही शनिवारी सेकंड शिफ्ट असल्याने तेही द्पारी दोन वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे कामावर गेले.

_MPC_DIR_MPU_II

सेकंड शिफ्ट संपवून रविवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी पप्पू त्यांच्या आणि मयत किशोर याच्या मित्रांसोबत घरी जाण्यासाठी निघाले.

दरम्यान त्यांना त्यांच्या लहान भावाचा किशोरच्या मोबाईलवरून फोन आला. किशोर मोरमारवाडी ते करंजगाव रस्त्याच्या साईडपट्टीवर पमाजी खराडे यांच्या शेताजवळ पडला असल्याचे लहान भावाने सांगितले.

फिर्यादी यांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता त्यांचा भाऊ किशोर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र किशोर याचा जागीच मृत्यू झाला होता.

किशोरच्या तोंडावर, डोक्यात आणि हातावर अज्ञातांनी धारदार हत्याराने वार केले होते. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. जवळच किशोरची दुचाकी उभी होती. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कामशेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.