Kamshet Crime News : कामशेत येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत 67.37 ग्रॅम मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – मेफेड्रोन या आमली पदार्थ जवळ बाळगून त्याच्या विक्री प्रकरणी दोघांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि. 4) कामशेत परिसरात हि कारवाई केली. आरोपीकडून 67.37 ग्रॅम मेफेड्रोन सह 6 लाख 68 हजार 100 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिवाजी मारुती कडू (वय 32, रा. कुरवंडे, ता.मावळ) व सोमनाथ वसंत बालगुडे (वय 30, रा.पाथरगाव ता.मावळ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कामशेत परिसरात एक चारचाकी (एमएच 14 जीएच 1992) व (एमएच 14 एचजी 9318) दुचाकी उभी करून संशयित रित्या थांबले होते. पोलिसांनी त्यांची जाऊन चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी आरोपी सोमनाथ बालगुडे याची झडती घेतली असता त्याच्या जवळ मेफेड्रोनच्या 15 पुड्या सापडल्या. या पुड्या त्याने आरोपी शिवाजी कडू यांच्याकडून 30 हजार रूपयाला विकत घेतल्याचे सांगितले.

त्यानुसार आरोपी शिवाजी कडू याच्या कारची झडती घेतली, त्यामध्ये 52.20 ग्रॅम मेफेड्रोन तसेच, एक मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आढळला. आरोपी सोमनाथ बालगुडे याच्याजवळ 15.17 ग्रॅम मेफेड्रोन सापडले. दोघांकडून 1 लाख 34 हजार 740 किंमतीचे 67.37 ग्रॅम मेफेड्रोन आणि 5 लाख 33 हजार 360 किंमतीची कार, मोटारसायकल, वजनकाटा, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 6 लाख 68 हजार 100 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी कामशेत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.