Wakad : चिमुकलीच्या अपहरणाचा कॉल अन् वाकड पोलिसांची धावपळ…

एमपीसी न्यूज – चार वर्षीय चिमुकलीचे थेरगाव (Wakad) येथील शाळेतून अपहरण झाल्याचा कॉल डायल 112 वर आला अन वाकड पोलिसांची एकच धावपळ उडाली. मात्र, चिमुकलीचे अपहरण झाले नसून ती खेळता खेळता शाळेच्या आवारातून बाहेर पडली अन एका पादचारी व्यक्तीने तिला पोलीस चौकीत आणल्याचे समजताच पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

चार वर्षीय आरोही (नाव बदलले आहे) थेरगाव येथील सेंट एलिया हायस्कूल या शाळेत ज्युनिअर केजीमध्ये शिकते. मंगळवारी (दि. 20) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ती शाळेत आवारात खेळत असताना अचानक बाहेर पडली. आरोही शाळेत दिसेना म्हणून शाळा व्यवस्थापनाने तिच्या घरच्यांना फोन केला. मात्र, ती घरच्यांच्या देखील ताब्यात नसल्याचे समजताच शाळेकडून डायल 112 वर आरोहीचे अपहरण झाल्याचा कॉल देण्यात आला.

डायल 112 कडून क्षणात वाकड पोलिसांना माहिती मिळाली. चार वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, वाकड डीबी पथकातील अधिकारी, कर्मचारी असा पोलिसांचा मोठा फौजफाटा थेरगाव येथील शाळेच्या परिसरात दाखल झाला.

शाळेच्या परिसरातून बाहेर जाणाऱ्या मार्गांवर पोलिसांनी नाकाबंदी (Wakad) केली. शाळेतील आणि बाहेरच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली. सहायक पोलीस आयुक्तांच्या मदतीने तपासाची पुढील दिशा आखत असतानाच थेरगाव चौकीतून माहिती मिळाली की, चार वर्षांच्या एका मुलीला एका व्यक्तीने थेरगाव चौकीत आणले आहे.

आरोहीच्या पालकांसह पोलीस थेरगाव चौकीत आले. आईला पाहताच आरोही तिच्या आईच्या कुशीत विसावली. आरोही सापडल्याचे समजताच पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

Maharashtra : सलोखा वाढतोय! पाच महिन्यात 149 दस्तांची नोंद; पुण्यात 17 दस्त

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.