Kiwale News : विकासनगरातील ओम पॅराडाईजमध्ये पावसाचे पाणी ; युवा सैनिकाच्या तत्परतेने झाला पाण्याचा निचरा

एमपीसीन्यूज : महापालिकेच्या किवळे -विकासनगर येथील ओम पॅराडाईस सोसायटी, शांती निवास आणि मयूर वॉशिंग सेंटर या परिसरात आज ( शुक्रवारी ) दुपारी झालेल्या जोरदार पावसाचे पाणी घुसलेले. त्यामुळे स्थानिक रहिवाशांची तारांबळ उडाली. दरम्यान, स्थानिक रहिवाशांच्या विनंतीवरून युवा सैनिक राजेंद्र तरस जेसीबी घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळात जेसीबीच्या साहाय्याने लगतचा तुंबलेला नाला साफ करून सोसायटीमध्ये घुसलेल्या पाण्याचा निचरा करण्यात यश आले.

दरम्यान, विकासनगरमधील अन्य काही भागातही पावसाचे पाणी घरामध्ये शिरल्याची माहिती तरस यांनी दिली.

देहूरोड-कात्रज बाहयवळण महामार्गालगत विकासनगर हद्दीत ओम पॅराडाईज आणि शांती निवास वसाहत आहे. या वसाहतीत अनेक वर्षांपासून मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. हा परिसर उघड्या नाल्यालगत आहे. देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीतील सांडपाणी या नाल्यातून वाहत येत असते. बाह्यवळण महामार्गावरील छोट्या पुलाखालून हा नाला पुढे किवळे गावाच्या हद्दीत जातो.

मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या नाल्याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात जवळपास चार महिने हा नाला तुंबलेला असतो. मुसळधार पावसात नाल्यातील सांडपाणी थेट शांती निवासमधील घरांमध्ये शिरते. तसेच ओम पॅराडाईजच्या आवारातही हे सांडपाणी जाते.

त्यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी आणि डासांमुळे परिसरातील नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे या नाल्याच्या भुयारी पूल रुंद करावा आणि हा नाला बंदिस्त करावा, अशी मागणी या पूर्वी शिवसेना विभागप्रमुख विजू थोरी आणि सामाजिक कार्यकर्ते सुनीलकुमार सिंग यांनी केली होती.

त्यात आज गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी व नाल्याचे पाणी सोसायटीत शिरले. त्यामुळे  स्थानिक नागरिकांनी याबाबात युवा सेनेचे कार्यकर्ते राजेंद्र तरस यांना माहिती दिली.

त्यावर तरस यांनी तातडीने जेसीबीसह घटनास्थळी धाव घेत नाल्यातील पाण्याचा व सोसायटीतील पाण्याचा निचरा करून दिला. त्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच या भागात दरवर्षी पावसाळ्यात घरात पाणी शिरण्याची समस्या असते. ती कायमस्वरूपी दूर करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.