Last Movie of Sushant : सुशांतसिंहचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या ‘दिल बेचारा’च्या ट्रेलरला सर्वाधिक लाइक्स

Most likes on the trailer of Sushant Singh's last film 'Dil Bechara' अवघ्या २४ तासांत या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

एमपीसी न्यूज – युवा अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे अचानक जाणे रसिकांना सुन्न करुन गेले. अजूनही त्याच्या आत्महत्येचे कारण काय याबद्दल तर्कवितर्क केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर त्याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’चा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित झाला.  प्रेक्षकांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अवघ्या २४ तासांत या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. फक्त २४ तासांत या ट्रेलरला सर्वाधिक लाइक्स मिळाले असून याबाबतीत ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’लाही मागे टाकलं आहे.

सुशांतसिंग राजपूत व संजना सांघी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला ४४ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर युट्यूबवर या ट्रेलरला दोन कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’च्या पहिल्या आणि दुसऱ्या ट्रेलरला ३२ लाख आणि २९ लाख अनुक्रमे व्ह्यूज मिळाले होते. ‘दिल बेचारा’च्या ट्रेलरला अवघ्या एका तासात ५० लाख व्ह्यूज मिळाले.

_MPC_DIR_MPU_II

हा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. यामध्ये सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

किझी आणि मॅनी या दोघांची ही प्रेमकहाणी आहे. किझी कॅन्सरग्रस्त आहे आणि मॅनीचं तिच्यावर खूप प्रेम आहे. सुमारे अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये एक सेकंदही सुशांतवरुन नजर हटत नाही. तर किझीच्या भूमिकेत संजनाही लक्षात राहतेय. ट्रेलरमध्ये सुशांतचे अनेक उत्कृष्ट संवाद आहेत, ज्याद्वारे त्याने चित्रपटात कॅन्सरशी लढा देत असलेल्या संजना सांघीला हसवताना आणि तिचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलरमधील सुशांतचा एक संवाद अधिक लक्ष वेधून घेतो. ‘जन्म आणि मरण आपल्या हातात नाही पण कसे जगायचे हे आपल्या हातात आहे’, हा सुशांतचा संवाद मनाला भिडतो.

मुकेश छाबरा दिग्दर्शित हा चित्रपट यापूर्वी 29 नोव्हेंबर 2019 रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु काही कारणास्तव त्याची रिलीज तारीख 8 मे 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, कोरोनव्हायरसचा उद्रेक झाल्यामुळे लॉकडाउन घोषित करण्यात आला आणि सिनेमा हॉल बंद पडले. त्यामुळे चित्रपट मोठ्या स्क्रीनपर्यंत पोहोचू शकले नाही. त्यानंतर १४ जून रोजी सुशांतने अचानकपणे आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलले. त्यामुळे या चित्रपटाविषयी लोकांची उत्सुकता अधिकच वाढली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.