Pune : …अन्‌ डोंगरकुशीतील “कळकराई’ प्रकाशले!

एमपीसी न्यूज  –  कळकराई हे आंदर मावळातील अत्यंत दुर्गम, सह्याद्रीच्या डोगरांनी वेढलेले गाव. सुमारे दीड किलोमीटर खोल व अरुंद दरीत असणाऱ्या वीजवाहक तारा वादळी पावसामुळे तुटल्या अन्‌ वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व धाडसी तरूणांनी अरुंद व खोल दरीत उतरून दुरुस्तीचे काम पूर्ण केले. त्यामुळे कळकराई गाव पुन्हा प्रकाशले व महावितरणच्या ग्राहकसेवेने ग्रामस्थ सुद्धा आनंदले. 
 
मावळ तालुक्‍यातील कळकराई गाव हे खेड, मावळ व कर्जत तालुक्‍यांच्या सीमेवर आहे. कळकराईजवळील सावळा गावापर्यंत डांबरी रस्ता आहे. त्यापुढे सुमारे साडेतीन किलोमीटर डोंगराला वळसा घालत, धबधब्यांचे वेगवान प्रवाह ओलांडून जंगलातील अत्यंत खडतर पायवाटेने डोंगर पायथ्याशी असलेल्या 70 घरांच्या कळकराई गावात जाता येते. मावळकडे दळणवळणासाठी अत्यंत प्रतिकूल बिकटवाट व डोंगरदऱ्या असल्याने कळकराईमधील सर्व व्यवहार प्रामुख्याने कर्जतच्या बाजारपेठेत होतात. फक्‍त प्रशासकीय कामासाठी या गावाचा मावळ तालुक्‍याशी संबंध आहे. सन 2005 मध्ये कळकराई गावाजवळील डोंगरमाथ्यावर वीजयंत्रणेसह रोहित्र उभारण्यात आले व त्यास महावितरणच्या तळेगाव उपकेंद्रातून 22 केव्ही वाहिनीद्वारे वीज देण्यात आली. या रोहित्रापासून सुमारे दीड किलोमीटर अरुंद दरीमध्ये 5 ते 6 किलोमीटर लांबीच्या वीजतारा टाकून कळकराई गावाला वीजपुरवठा सुरु आहे. 
 
वीजपुरवठा सुरळीत असतानाच जूनच्या पहिल्या आठवड्यात वादळ व मुसळधार पावसाने आंदर मावळात थैमान घातले. यामध्ये दरीत असलेल्या वीजतारा तुटल्या अन्‌ कळकराई गावाचा वीजपुरवठा खंडित झाला. अतिशय खोल, अरुंद व कातळ पाषाण असलेल्या दरीमधील दुरुस्ती कामाचे खडतर आव्हान महावितरणसमोर होते. डोंगरावरील रोहित्रापासून ते पायथ्याशी असलेल्या कळकराई गावापर्यंत नवीन वीजतारा टाकणे आवश्‍यक होते. संततधार पाऊस असल्याने निसरड्या दरीत उतरणे शक्‍य झाले नाही. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्याही परिस्थितीत प्रयत्न केला पण दुरुस्तीचे काम शक्‍य झाले नाही. 

 
कळकराई गावात महावितरणचे 55 वीजग्राहक आहेत. विशेष म्हणजे ते नियमित वीजबिलांचा भरणा करणारे आहेत. थकबाकी नाही. या प्रामाणिक वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी महावितरणकडून निसर्गाशी झुंज देत वीजपुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू झाले. प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनीही कळकराईच्या वीजपुरवठ्याची माहिती घेतली व दुरुस्तीच्या कामाबाबत मार्गदर्शन केले. अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता प्रल्हाद खडके यांच्या नेतृत्वात दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाली. नवीन वीजतारा व दुरुस्तीचे साहित्य डोंगराळ पायवाटेने नेण्यासाठीच सुमारे 4 ते 5 दिवस लागले, अशी त्या ठिकाणची नैसर्गिक स्थिती आहे. उपकार्यकारी अभियंता विजय जाधव, शाखा अभियंता श्‍याम दिवटे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला व सहकार्याचे आवाहन केले. 
 
ग्रामस्थांचे चेहरे आनंदाने उजळले! 
 
महावितरणचे प्रशिक्षित कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व ठाकर समाजातील धाडसी तरूण आदी सुमारे 30 ते 35 जणांच्या पथकाने डोंगरमाथ्यावरून खोलदरीतून कळकराईपर्यंत वीजतारा ओढण्याचे काम सुरू केले. या जोखमीच्या कामात महावितरणचे अधिकारी धोका टाळण्यासाठी स्वतः देखरेख करीत होते. नवीन वीजतारा ओढणे व इतर महत्वाचे दुरुस्ती काम करण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागला. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता हे काम नुकतेच पूर्ण झाले. त्यानंतर सुरळीत वीजपुरवठ्याने कळकराई गाव पुन्हा प्रकाशले अन्‌ ग्रामस्थांचे चेहरे सुद्धा आनंदाने उजळले. महावितरणचे अभियंते, कर्मचाऱ्यांचे व दुरुस्ती कामात सहकार्य करणाऱ्या धाडसी तरूणांचे ग्रामस्थांनी कौतुक केले. तसेच खडतर व बिकट नैसर्गिक परिस्थितीत धाडसी काम करून ग्राहकसेवा देणाऱ्या महावितरणला कळकराईचे माजी सरपंच लक्ष्मण कावळे व चंद्रकांत कावळे यांनी गावाच्या वतीने धन्यवाद दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.