Lonavala : लोहगड भाजे रोड म्हणजे मृत्यूचा सापळा!

एमपीसी न्यूज – अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उखडलेल्या लोहगड भाजे रोडची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रोडचे काम पूर्ण करावे, अशी मागणी लोहगड-विसापूर मंच व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. लोहगड-विसापूर ऐतिहासिक ठिकाण असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. त्यांना या रोडचा अंदाज येत नाही, त्यामुळे एखादा मोठा अनर्थ होऊ शकतो, अशी घटना टाळण्यासाठी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

लोहगड भाजे रोड झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्ण उखडलेला आहे. या रस्त्यावरील खडी पूर्ण निघालेली आहे. तसेच वळणावरती मोठे खड्डे पडलेले आहेत. लोहगड-विसापूर ऐतिहासिक ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. बाहेरील पर्यटकांना या रोडचा अंदाज येत नाही. त्यामुळे वेड्यावाकड्या वळणावरती त्यांची तारांबळ उडते. त्यामुळे चारचाकी असलेले वाहन वरती जाऊ न शकल्यामुळे रस्त्याच्या मध्येच लावून पर्यटक वरती जातात. त्यामुळे अन्य लोकांना वरती गाडी घेऊन जाता येत नाही. आत्ता दुचाकी सुद्धा नीट जाऊ शकत नाही. स्थानिक जनतेला याचा रोज खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

या रस्त्याची दुरुस्ती करत असताना वळणावरती रस्ता रुंदीकरण करावा. तसेच रस्त्याच्या कडेला पार्किंगची व्यवस्था करावी. कारण पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी लोहगड-विसापूर विकास मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष संदीप गाडे, विश्वास दौंडकर, सचिन निंबाळकर, सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.