Lonavala : स्वीकृत नगरसेवक न बदलल्यास भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

एमपीसी न्यूज- लोणावळा नगरपरिषदेत भाजपाच्या गोटातून स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून गेलेल्या सदस्यांचा पक्षाने ठरवून दिलेला कालावधी पूर्ण झाला असल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात यावा व त्याजागी नवीन सदस्याची निवड करावी अशी मागणी लोणावळा शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. तातडीने यावर कार्यवाही न झाल्यास बहुसंख्य कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे एका पदाधिका‌‌र्‍याने सांगितले.

लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर सभागृहात स्वीकृत सदस्य म्हणून भाजपाने तीन सदस्यांना दीड व दोन वर्ष या फाॅर्म्युल्यानुसार संधी देण्याचे ठरविले होते. यानुसार प्रथम संधी बाळासाहेब जाधव यांना देण्यात आली. त्यानंतर अविनाश पवार व बाबा शेट्टी यांना संधी देण्यात येणार आहे. मात्र दीड वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतरही जाधव यांनी राजीनामा न दिल्याने वरील दोन्ही इच्छुक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.

भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अामदारांची भेट घेत राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. तसेच चार दिवसापूर्वी झालेल्या मावळ भाजपाच्या कोअर कमिटी बैठकीत देखील या विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे. येत्या चार पाच दिवसात स्वीकृत सदस्यांचा राजीनामा न झाल्यास भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे या पदाधिका‌र्‍याने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.