Lonavala : परतीच्या पावसाने भातपिकाचे अतोनात नुकसान; तालुक्यात भात कापणी रखडली

एमपीसी न्यूज – लोणावळा ग्रामीण परिसरात परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मावळ तालुक्यात ठिकठिकाणी भाताचे कापणी योग्य झालेले पीक आडवे पडले आहे, तर कुठं कापलेले भातपीक पाण्यात पूर्णपणे भिजून पेंढा आणि तांदूळ खराब झाले आहे. याशिवाय संपुर्ण तालुक्यात भात कापणी रखडली आहे.

लोणावळा ग्रामीण भागातील कार्ला, देवले, भाजे, पाटण, बोरज, दहिवली, वेहरगाव, वाकसई, शिलाटणे, सदापूर, देवघर, कुसगाव, डोंगरगाव, औंढे, औंढोली येथील शेतीचे नुकसान झाले आहे. याबाबत देवले येथील जयराम आंबेकर म्हणाले, पावसाचा हा लपंडाव असाच चालू राहिला तर संपूर्ण पीक हातातून जाईल. शिवाय केलेला खर्च देखील मिळणार नाही.

पेंढा भिजल्याने जनावरांसाठी वैरणीचा प्रश्न होणार गंभीर
दूध उत्पादक शेतकऱ्यांना पावसाळ्यात मुबलक प्रमाणात मिळणारा हिरवा चारा कमी होत चालला आहे. त्यानंतर त्यांची मदार असते ती भाताच्या पेंढ्यावरच परंतु भात कापणी रखडली आहे. काही ठिकाणी तयार पेंढा पूर्णपणे खराब होऊ लागला आहे. संततधार पावसाने शेती पेरणी योग्य होत नसल्याने कडधान्ये तसेच मका, बाजरी, घास इतर हिरव्या चाऱ्याची पेरणीसुद्धा करता येणं शक्य नाही. पशुपालनाचा जोडधंदाच आता वैरणीच्या कमतरतेमुळे पशुपालकांच्या चांगलाच जिव्हारी येत आहे. चाऱ्याच्या टंचाईमुळे व महागाईमुळे जनावरांचे पालन पोषण कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.