Lonavala : कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून देण्याकरिता कचराडेपोवर महिलांचे हळदी कुंकु

लोणावळा नगरपरिषदेच्या अनोख्या उपक्रमाला महिलांचा भरघोस प्रतिसाद

एमपीसी न्यूज- कचरा वर्गीकरणाचे महत्व रामीण भागात राहणार्‍या महिलांना कळावे यासाठी लोणावळा नगरपरिषद महिला व बालकल्याण समिती तसेच प्रगती महिला नागरी सह. पतसंस्था यांच्या वतीने रथसप्तमी निमित्त वरसोली येथील कचरा डेपोवर आगळ्या वेगळ्या पध्दतीने हळदी कुंकु समारंभ पार पडला.

लोणावळा शहर व परिसरातील ग्रामीण भागात राहणार्‍या महिलांना स्वच्छतेचे महत्व समजावे तसेच घंटागाडीत ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन देणे किती महत्वाचे आहे याची प्रत्यक्ष माहिती तसेच कचराडेपो वरील बायोगॅस प्रकल्प व खत निर्मिती प्रकल्पाची माहिती महिलांना देण्याकरिता लोणावळा नगरपरिषद महिला व बालकल्याण समिती तसेच प्रगती महिला नागरी सह. पतसंस्था यांच्या वतीने रथसप्तमी निमित्त वरसोली येथील कचरा डेपोवर आगळ्या वेगळ्या पध्दतीने हळदी कुंकु समारंभ पार पडला. सुमारे पाच ते सहा हजार महिलांनी याठिकाणी येऊन कार्यक्रमासोबत प्रत्यक्षात कचराडेपोवरील कामकाजाची माहिती घेतली.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव व महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुर्वणा अकोलकर, उपसभापती गौरी मावकर, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापती संध्या खंडेलवाल, माजी सभापती बिंद्रा गणात्रा, पूजा गायकवाड, काँग्रेसच्या गटनेत्या आरोही तळेगावकर, मंदा सोनवणे, रचना सिनकर, जयश्री आहेर, प्रगती नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा पार्वती रावळ, उप‍ाध्यक्षा रसवंती मानकामे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शैलजा फासे यांनी येणार्‍या महिलांना स्वच्छतेची माहिती देत स्वागत केले.

महिला व बालकल्याण समिती व प्रगती महिला नागरी सहकरी पतसंस्था यांच्या संयुक्त सहकार्याने वरसोली येथील नगरपरिषदेच्या कचरा डेपोवर ह्या आगळ्या वेगळ्या हळदी कुंकु समारंभाचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील हा पहिलाच वेगळा उपक्रम असून याठिकाणी महिलांना ओल्या कचर्‍यापासून बायोगॅस निर्मिती कशी केली जाते तसेच सुक्या कचर्‍यापासून खत कसे बनविले जाते याबाबतची माहिती देण्यात आली. महिलांनी देखील कचराडेपोवरील प्रकल्पांची प‍ाहणी करत यापुढील काळात लोणावळा शहराला कचरामुक्त शहर करण्याकरिता प्रयत्न करण्याचा तसेच ओला व सुका कचरा हा वेगळा करुनच देण्याचा मानस व्यक्त केला.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या, “लोणावळा शहरात मागील दोन वर्षापासून स्वच्छतेचा जागर सुरु आहे. मागील वर्षी लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक अाला. यावर्षी शहर शंभर टक्के कचराकुंडी मुक्त करण्यात आले असून घरोघरचा कचरा हा घंटागाडीत ओला व सुका असे वर्गीकरण करुन गोळा केला जातो. मात्र हा कचरा वर्गीकरण करुन का द्यावा, कचर्‍याचे पुढे काय होते याबाबत महिलांच्या मनात अनेक प्रश्न असतात. याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले “

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.