Pimpri News: पालिका नागरी सहभागातून ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत नागरिकांच्या सहभागातून निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात राज्यात अव्वल क्रमांक मिळावा, यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत.

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’ हे राज्यातील 667 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2 ऑक्टोबर ते 31 मार्च 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्यानुसार, पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीत पर्यावरण संतुलन व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाला सुरुवात झाली आहे.

या अभियानाचे मूल्यमापन होणार असून यासाठी विविध वर्गवारीत 1500 गुण आहेत. त्यामध्ये पृथ्वी 600 गुण, वायू 100 गुण, जल 400 गुण, अग्नी 100 गुण, आकाश 300 गुणांचा समावेश आहे. पृथ्वी पंचतत्वाअंतर्गत नुसार हरित आच्छादन आणि जैवविविधता, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, नवीन हरितक्षेत्र विकास योजनेचे नियोजन करण्यात येत आहे. वायू पंचतत्वाअंतर्गत प्रयोगशाळांमार्फत परिक्षण केलेली वायू गुणवत्ता, धूळ कमी करण्यासाठी रस्त्याच्या बाजूचे हरितीकरण, नॉन मोटराईझ वाहतुकीस प्रोत्साहन या बाबींवर भर दिला जाणार आहे.

जल पंचतत्वाअंतर्गत तलाव संवर्धन, जैवविविधतेचे जतन, जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन, नदी, तळे व नाले यांची स्वच्छता, रेनवॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी, मैला व्यवस्थापन व प्रक्रीया असे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. अग्नी तत्वानुसार नुतनीकरण योग्य उर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन, सौरऊर्जेवरील एलईडी दिवे, हरित इमारतींची संख्या, विद्युत वाहनाकरिता चार्जिंग पॉइंट निर्माण करण्यात येणार आहे.

आकाश तत्त्वानुसार पर्यावरण सुधारणा व संरक्षणासाठी जनजागृतीसाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम, स्थळ आणि प्रकाश या स्वरुपात मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती आणि शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे प्रसार व प्रचार केला जाणार आहे. महापालिका क्षेत्रात अनेक वस्त्यांचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्या अनुषंगाने शहरातील पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी दिली.

या अभियानाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामांचे मुल्यमापन 1 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात येईल. त्याचा निकाल जागतिक पर्यावरण दिनी म्हणजेच 5 जून रोजी जाहीर करून बक्षिस वितरण करण्यात येईल. या अभियानाअंतर्गत गुणानुक्रमानुसार प्रथम येणारी तीन अमृत शहरे, तीन नगरपरिषदा, तीन नगरपंचायती, तीन ग्रामपंचायती यांना बक्षिस देण्यात येणार आहे. या अभियानात काम करण्यास प्रोत्साहित केल्याबद्दल विभागिय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनाही गौरविण्यात येणार आहे.

सर्वोत्तम कामगिरी करणा-या विभागाचे एक विभागिय आयुक्त, तीन जिल्हाधिकारी आणि तीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर उच्चतम कामगिरी करणा-या प्रत्येकी एका नागरी स्थानिक संस्थेस आणि ग्रामपंचायतीस प्रोत्साहनात्मक बक्षिस दिले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.