Chakan : शिरूरची लोकसभा घुमायला सुरुवात…!! प्रचाराची टॅग लाईन दर्शविणारे फलक झळकले!

(अविनाश दुधवडे)

एमपीसी न्यूज- स्थानिक प्रलंबित प्रश्न आणि शासनाच्या भूमिकेवर हल्ला करणारा मजकूर लिहिलेले फलक मागील आठवडाभरापासून चाकण परिसरात महामार्गांवर आणि चौकाचौकात झळकत आहेत. ठिकठिकाणी वेगवेगळे प्रश्न मांडणारे हे फलक सर्वसामान्य नागरिक आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असून निवडणूक प्रचाराचा उहापोह करणाऱ्या याच प्रश्नांवर आगामी शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक केंद्रित होणार असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्री गणेशा याच फलकांच्या माध्यमातून झाला की काय ? जाहिरात फलकांवरील हेच प्रश्न प्रचाराची टॅग लाईन असणार काय ? याबाबत नागरिकांत चर्चा सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीचे संकेत मिळालेल्या विलास लांडे यांनी लोकसभा मतदारसंघात एकीकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे सुरू केले असून दुसरीकडे प्रचंड फलकबाजी करीत सामान्यांच्या भावनांना हात घालतील असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांनी सर्वत्र ही तुफान फलकबाजी केली आहे त्यांनाच या मतदारसंघातून पक्ष उमेदवारी देणार असल्याचे त्यांच्या पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.

सलग तीन वेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या खासदार शिवाजीराव आढळराव यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीची चाचपणी सुरु आहे. अनेकांनी शड्डू ठोकत ताकद दाखविण्याचे निरनिराळे प्रयोग सुरु केले आहेत. मात्र या मतदारसंघात यापूर्वी निवडणूक लढविलेल्या उमेदवारास रिंगणात उतरवण्याची तयारी राष्ट्रवादीने चालविली असल्याचे पक्षाचे कार्यकर्ते बोलत आहेत. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने संबंधित संभाव्य उमेदवार विलास लांडे यांनी आपला संपर्क वाढवला असून, त्यांनी जुने कार्यकर्ते, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीसह काँग्रेसचे पदाधिकारी व अन्य पक्षातील काही नेत्यांच्या भेटी-गाठी सुरु केल्या असल्याची चर्चा आहे.

पूर्वीचा खेड आणि सध्याचा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र सलग तीनदा येथे मोठ्या मताधिक्क्याने खासदार आढळराव यांनी विजयश्री खेचून आणून शिवसेनेचा झेंडा आता खोलवर रोवला गेला आहे. सेनेचे एकहाती वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात सेनेकडून अन्य कुणीच सक्षम उमेदवार नसल्याने सध्याच्या खासदारांनाच सेनेची उमेदवारी असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. काँग्रेसकडून या लोकसभेच्या जागेवर हक्क सांगितला जात नसून राष्ट्रवादीचेच घड्याळ यावेळी निष्ठेने हातात बांधण्याचा पवित्रा अनेकांनी घेतला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ सलग चौथ्यांदा हातातून गेल्यास राष्ट्रवादीवर मोठी नामुष्की ओढवणार असल्याने हा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी संभाव्य उमेदवार आणि नव्या जुन्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सोशल माध्यमे, संपर्क यंत्रणा, नाराजांच्या नाकदुऱ्या काढून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सांगड घालून सर्व शक्ती पणाला लावायला सुरुवात केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.