Lonikand : वूमन हेल्पलाइनच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या पतीस अटक

एमपीसी न्यूज- नववीमध्ये शिकणाऱ्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह लावून देवून आई वडिल मुंबईला फरार झाले. वुमन हेल्पलाईन व आळंदी पोलिसांच्या मदतीने 24 वर्षीय युवकास व त्याच्या आई वडिलांना लोणीकंद येथुन रात्री आठच्या सुमारास अटक करण्यात आली.

महिलांसाठी काम करणाऱ्या वुमन हेल्पलाइनला शुक्रवारी सकाळी (दि. 31) सकाळी नऊ वाजता एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने आळंदीमध्ये होत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचे लग्न थांबवण्याची विनंती केली. वुमन हेल्पलाइनच्या अध्यक्षा नीता परदेशी यांनी तात्काळ आपल्या काही सहकाऱ्यांना घेऊन आळंदीला धाव घेतली आणि प्रत्येक मंगल कार्यालयात शोध घेतला. मात्र आळंदीमध्ये कोणताही सुगावा न लागल्याने त्यांनी आळंदी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली आणि शोध घेण्याची विनंती केली.

वूमन हेल्पलाईनकडे उपलब्ध असलेला फोन नंबर ट्रेस करुन मुलीच्या आईचा नंबरचे लोकेशन मिळवले. दरम्यान पोलीस आपल्या मागावर असल्याचा सुगावा लागल्याने या मुलीचे लग्न आळंदी ऐवजी लोणीकंदला उरकण्यात आले होते.

ही माहिती समजताच पोलिसांनी वूमन हेल्पलाईनच्या सोबतीने तात्काळ लोणीकंदच्या भुर्के गावात धाव घेतली आणि घाईमध्ये लग्न उरकलेल्या मुलासह इतर नातेवाइकांना लोणीकंद पोलिसांनी रात्री 8 च्या सुमारास अटक केली. मुलीचे आई वडील लग्न उरकून मुंबईला फरार झाले होते. नवरामुलगा विद्याधर भगवान ब्रह्माणे वय (24) मुलाचे आई वडील, मुलीचे आई वडील, आणि मामा यांच्या सह उपस्थित नातेवाईकांवर बाल विवाह प्रतिबंध कायदा कलम (9),(10),(11) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडित मुलीला पोलिसांनी सोबत घेऊन तिला माहेर या सामाजिक संस्थेकडे सुपूर्द केले. आळंदी पोलीस, ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय व वूमन हेल्पलाईन यांच्या संयुक्त प्रत्यनातून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात यश आले. अशी भावना वूमन हेल्पलाईनच्या अध्यक्षा नीता परदेशी यांनी व्यक्त केली या कारवाईमध्ये वुमन हेल्पलाइनच्या कृष्ण कुंदनानी,अॅड. मोनिका पिसाळ, अॅड. संकल्पा वाघमारे, क्रांती कदम, सारिका परदेशी यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.