Pune : अज्ञातांचे पैलू : स्त्री – पुरूष समान हक्कासाठी आयुष्य वेचणा-या ज्येष्ठ समाजसेविका विद्या बाळ

(प्रमोद यादव)
एमपीसी न्यूज – महिलांच्या समान हक्कासाठी वैचारिक लढा देणा-या आणि संवाद व वैचारिक चळवळीला प्राधान्य देणा-या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच गुरुवारी (३० जानेवारी) किडनी निकामी झाल्याने निधन झाले. स्वत:ला फक्त एक कार्यकर्ता समजणा-या विद्या बाळ आयुष्यभर सावित्रीबाई फुले यांच्या मार्गावर चालत राहिल्या. पन्नास वर्षा पेक्षा जास्त काळ पत्रकारिता केलेल्या विद्या ताईंनी वेगवेगळ्या भूमिका बजावत स्त्री चळवळीला शहरापासून गावापर्यंत प्रत्येक घरामध्ये पोहचविले. ‘स्त्री’ मासिकासाठी काम करत असताना त्यांनी महिलां संबंधित वेगवेगळ्या सामाजिक व सांस्कृतिक विषयावर परखड भाष्य केले. विद्या ताई सांगतात स्त्री मध्ये काम करत असतानाच ‘मिळून सा-याजणी’ या मासिकाची मूहुर्तमेढ रोवली गेली.
पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केलेल्या विद्या ताईंनी सुरूवातीला आकाशवाणी वर कार्यक्रम सादरकर्ते म्हणून दोन वर्षे काम केले. १९६४ – १९८६ या प्रदीर्घ काळात त्यांनी  किर्लोस्कर समूहाच्या ‘स्त्री’ या मासिकात सुरूवातीला सहाय्यक संपादक म्हणून ते नंतर मुख्य संपादक म्हणून काम पाहिले. ‘स्त्री’ मध्ये काम करत असतानाच त्यांनी महिलांना बोलतं करण्यासाठी ‘बोलते व्हा’ केंद्र सुरू केले. महिलांविषयक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा आणि मोकळेपणाने संवाद साधण्यासाठी ते व्यासपीठ विद्या ताईंनी महिलांसाठी उपलब्ध करून दिले.’नारी समता मंच’ मुळे महिलांसाठी त्यांच्या तक्रारी आणि व्यथा जाणून घेण्याचं हक्काचं व्यासपीठ निर्माण झाले ज्या मधून वेगवेगळ्या प्रकारच्या घरगुती हिंसा आणि जाचांना वाचा फोडण्याचे काम केले गेले. गाजलेल्या शैला लाटकर आणि मंजुश्री सारडा केसेस ने विद्या ताईंचं काम घराघरात पोहोचवले. नारी समता मंच तर्फे गावोगावी रस्त्यावर मी एक मंजुश्री नावचे प्रदर्शन केले ज्याचे पडसाद सबंध महाराष्ट्रात उमटले.
विद्याताईंना  स्त्री चळवळ फक्त महिलांपुरती मर्यादित असू नये असे वाटत असे. पुरूषांनी सुद्धा हिरिरीने भाग घ्यावा आणि वर्षोंवर्षे चालत आलेल्या मानसिक गुलामगिरीचा विरोध करावा असं त्या ठामपणे सांगत. एवढंच नव्हे तर पुरूषांनी सुद्धा व्यक्त व्हायला हवं म्हणून त्यांनी डॉ. सत्य रंजन साठे पुरुष संवाद केंद्र सुरू केले. अन्याय व  अत्याचाराविरोधात रात्रीचे हातात टॉर्च घेऊन जनजागृतीसाठी काढलेली प्रकाश फेरी, ठिकठिकाणी केलेली पथनाट्य, निदर्शने, काढलेले मोर्चे, परिसंवाद तसेच अॅसिड हल्ला विरोधात ठिकठिकाणी ‘दोस्ती जिंदाबाद’ नावाने काढलेल्या मोर्चामुळे स्त्री चळवळ गावागावात पोहोचली. ग्रामिण स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करण्यासाठी ग्रोईंग टुगेदर नावाने एक उपक्रम चालू केला. स्त्री सखी मंडळ, नारी समता मंच यांच्या कामाचा प्रभाव सर्वत्र दिसू लागला आजही यांच्या शाखा गावोगावी आहेत.
स्वतः संस्थापक व संपादक असलेल्या विद्या ताईंनी मिळून सा-याजणी नावाने मासिक सुरू केले. ज्यासाठी त्यांनी १९८७ पासून देणगी स्वरूपात पैसे जमा करून ऑगस्ट १९८९ मध्ये ते अधिकृतपणे सुरू केले. मासिकासाठी पब्लिक फंडिगच्या स्वरुपात जमा केलेले पैसे त्याकाळात दीड लाख रुपये जमा झाल्याचे सांगितले जाते. मातृत्वाचा गौरव करण्याने स्त्री संसारातच अडकून पडते व त्यातच धन्यता मानते, आपण हा समज खोडून काढायला हवा असं त्या म्हणत. स्त्रीत्व हे एकमेव राहता कामा नये.
लग्न करायचं का नाही केलं तर कधी हा अधिकार आपण ‘ती’ ला द्यायला हवा. स्त्रिला मुलं बाळं झाली नाही. तर तिला हिणवले जाते हे चुकीचे आहे. स्त्री आई झाली तरच ती पूर्ण होते का ? नाही तर ती अपूर्ण असते का? असा खडा सवालही त्या उपस्थित करायच्या. लैंगिक विषयावर चर्चा झाल्या पाहिजेत, अशी त्याची प्रखर भूमिका होती व त्या स्वतः अशी चर्चा सत्रे आयोजित करत. कित्येक वर्षांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आणि स्त्रिला मोकळे आकाश मिळवून देण्यासाठी त्या आयुष्यभर प्रयत्न करत राहिल्या. स्त्रियांना व्यक्त होण्याचे विविध मार्ग उपलब्ध करून दिले. बाहेरच्या लोकांना चळवळीत सहभागी करून घेतले. सामाजिक विषयांवर भाष्य करत साहित्य निर्माण केले व शहर आणि ग्रामीण ही दरी मिटवण्यासाठी प्रयत्न केले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या माणसाला माणसासारखे विचारपूर्वक जगता आले पाहिजे आणि स्वत:शी संवाद साधता आला पाहिजे. स्त्री पुरुष जर समान पातळीवर असतील तर स्त्रियांना समाजात व घरात समान हक्क आणि वागणूक मिळाली पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.