Mumbai: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1,895, त्यापैकी 1,146 रुग्ण एकट्या मुंबईत

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ काही केल्या कमी होताना दिसत नाही. राज्यात गेल्या 24 तासांत 187 नवे करोना रुग्ण सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या 1 हजार 895 झाली आहे. राज्यातील मृतांचा आकडा 127 वर पोहचला आहे. त्यामुळे राज्य शासनापुढील आव्हान आणखी मोठे झाले आहे.

राज्यात गेल्या 24 तासांत 187 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून त्यात काल दिवसभरात सापडलेल्या 134 रुग्णांचा समावेश आहे. तसेच गेल्या 24 तासांत 17 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 127 वर जाऊन पोहचली आहे. यात वयोवृद्धांचा सर्वाधिक समावेश असून करोनासह मधुमेह, रक्तदाब आणि न्यूमोनियासारखे आजारही या रुग्णांना असल्याचे आढळून आले आहे. नव्या रुग्णांपैकी मुंबईत 113, रायगड, अमरावती, भिवंडी, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी एक, पुणे 4, मीरा-भाईंदरमध्ये सात, नवी मुंबई, ठाणे आणि वसईत प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. तर नाशिकमध्ये 13 नवे करोनाचे रुग्ण आढळले असून हे सर्व रुग्ण आधीच्या करोनाबाधिताच्या संपर्कातील आहेत. तर मालेगावातील करोनाबाधितांची संख्या 27 वर गेली आहे.

राज्यात सर्वाधिक करोना रुग्ण मुंबईत असून मुंबईत एकूण 1 हजार 146 करोनाबाधित आहेत. तर पुण्यात 228, नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये प्रत्येकी 36, कल्याण-डोंबिवलीत 35, ठाण्यात 29, सांगलीत 26, नागपूरमध्ये 25 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 22 जण करोनाबाधित आहेत. त्यापैकी मुंबईत करोनामुळे आतापर्यंत 76 जणांचा तर पुण्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात आणि वसई-विरारमध्ये प्रत्येकी 3, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, सातारा आणि मालेगावमध्ये प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर मीरा भायंदर, पनवेल, पालघर, रत्नागिरी, नागपूर, बुलडाणा, औरंगाबाद, जळगाव, अमरावती आणि धुळ्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.