Mumbai : ऑनलाइन मद्याविक्रीसाठी परवानगी नाही, फसव्या जाहिरातींना बळी पडू नये; राज्य उत्पादन शुल्कचे आवाहन

एमपीसी न्यूज – राज्य उत्पादन शुल्क विभागाने कुठल्याच अनुज्ञप्तींना ऑनलाइन मद्य विक्री करण्याची परवानगी दिलेली नाही‌. त्यामुळे नागरिकांनी यासंदर्भातील फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आले आहे.

ऑनलाईन वाईन (online Wine) किंवा ऑनलाईन लिकर (Online Liquor) या मथळ्याखाली घरपोच मद्य सेवा दिली जाईल, अशा प्रकारच्या फेक मेसेजद्वारे (Fake Messages) समाज माध्यमांवर फसव्या जाहिराती दिल्या जात आहेत. ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाईल असे सांगून चोरट्यांकडून फसवणूक केली जात आहे. या फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन झालेला आहे. राज्यातील ‌ सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यस्तरावर निरंतर कारवाई सुरू आहे.

राज्यात 2 हजार 281 गुन्ह्यांची नोंद
यासंदर्भात राज्यात काल 147 गुन्हे नोंदविण्यात आले असून 66 जणांना अटक करण्यात आली आहे. 11 वाहने जप्त करण्यात आली असून 30 लाख 48 हजार किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबरोबरच 24 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत पूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये राज्यात 2 हजार 281 गुन्हे नोंदविण्यात आले असून 892 जणांना अटक करण्यात आली आहे. 107 वाहने जप्त करण्यात आली असून 5.55 कोटी रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध मद्याबाबत तक्रारीसाठी हेल्पलाईन
अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24×7 सुरू आहे. या नियंत्रण कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 18008333333 तर व्हाट्सॲप क्रमांक 8422001133 आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. वरील क्रमांकावर अवैध मद्याबाबतची तक्रार नोंद करण्यात यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.